सीएसआय आणि मुंबई महानगरपालिकेचा पुढाकार

अचानकपणे आलेल्या हृदयविकाराच्या झटक्याला कसे सामोरे जावे आणि तातडीने कोणते प्राथमिक उपचार द्यावेत, याबाबत जनजागृती करण्यासाठी ‘कार्डिओलॉजी सोसायटी ऑफ इंडिया’ (सीएसआय) आणि मुंबई महानगरपालिकेने पुढाकार घेतला आहे. जागतिक हृदय दिनाच्या निमित्ताने या मोहिमेचे उद्घाटन २९ सप्टेंबर रोजी वरळी येथील नॅशनल स्पोर्टस् क्लब ऑफ इंडिया येथे सकाळी ११.३० वाजता करण्यात येणार आहे. या वेळी अभिनेत्री काजोल विशेष अतिथी म्हणून उपस्थित असणार आहे.

कोणतीही पूर्वसूचना न देता अचानकपणे एखाद्या व्यक्तीला हृदयविकाराच्या झटका आल्यानंतर जवळ उपस्थित असलेल्या व्यक्ती भांबावून जातात. वेळेत उपचार न मिळाल्याने अनेकदा रुग्ण दगावल्याच्याही घटना घडल्या आहेत. तेव्हा अशा आपत्कालीन परिस्थितीमध्ये कोणते प्रथमोपचार करावेत, याबाबत मार्गदर्शन या कार्यक्रमांमध्ये केले जाईल. या जनजागृती मोहिमेमध्ये पालिकेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या कार्यक्रमांची माहिती पालिका आयुक्त अजोय मेहता देतील. पोलीस प्रशासन ही मोहीम कशी राबविणार याचा आढावा पोलीस आयुक्त सुबोध जयस्वाल मांडणार आहेत. यात ‘आयकेअर’ या उपक्रमाचा अनुभव डॉ. अर्मिदा फर्नाडिस व्यक्त करणार आहेत.