सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या ऐतिहासिक अशा अयोध्या निकालानंतर या निर्णयाचे चित्रपट क्षेत्रातील कलाकारांनीही स्वागत केले आहे. निर्णयाचे स्वागत करतानाच कलाकारांनी नागरिकांना शांतता आणि संयम राखण्याचेही आवाहन केले. फरहान अख्तर, हुमा कुरेशी, मधुर भांडारकर, हंसल मेहता यांनी समाजमाध्यमावर संदेश देत नागरिकांना आवाहन केले.

अभिनेता फरहान अख्तर याने ‘या निर्णयाचा सन्मान करावा. हा निर्णय काही असला तरीही त्याचा स्वीकार करावा. देशाला सर्व स्तरांतून वर येण्याची गरज आहे’ अशा शब्दांत भावना व्यक्त केल्या आहेत. ‘प्रिय भारतीयांना विनंती करते की, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करावे. सर्व नागरिकांनी एकत्र येऊन देशाला पुढे नेण्याची गरज असल्याचा संदेश’ हुमा कुरेशीने ट्विटरवर प्रसारित केला. अनुपम खेर यांनीही ‘अल्लाह तेरे नाम ईश्वर तेरो नाम सबको सन्मति दे भगवान’ असा संदेश, तर स्वरा भास्कर हिने ‘रघुपती राघव राजाराम सबको सन्मती दे भगवान’, दिग्दर्शक मधुर भांडारकर यांने ‘अयोध्यावरील निर्णयाचे एकत्रितपणे स्वागत करू या. अनेक वर्षे रखडलेल्या निर्णयावर आता तोडगा निघाला आहे, असे मत नोंदवले. दिग्दर्शक हंसल मेहता यांनी ‘अशा निर्णयाला वेळ लागतो. अनेक वर्षे जमिनीवरून झालेल्या वादावर निकाल लागला. या निर्णयाचे स्वागत करा, स्वीकार करा आणि यामुळे राजकीय भांडवल करून टीआरपी मिळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या समाजकंटकांकडे दुर्लक्ष करा’ अशा शब्दांत प्रतिक्रिया नोंदवली.

समाजमाध्यमावर विनोद, मिम्सना उधाण

चांद्रयान, रद्द केलेले ३७० कलम आणि आता राम मंदिर अशा घटनांमुळे अभिनेता अक्षय कुमारला या वेळीही नेटकऱ्यांनी समाजमाध्यमावर लक्ष्य केले. अभिनेता अक्षय कुमारचे चित्रपट हे विशेषत: देशभक्ती आणि सामाजिक बांधिलकीवर आधारित असल्याने महत्त्वाची घटना घडल्यास पुढील चित्रपटाची कथा सापडली का, अशा आशयाचे ट्वीट्स आणि मिम्स करण्यात येत आहेत. अक्षय कुमार सर्वोच्च न्यायालयाच्या बाहेर उभे राहत त्याला नवीन चित्रपटाची कथा मिळाली. अक्षयचा ‘रामजन्मभूमी’ हा पुढील चित्रपट, न्यायाधीश रंजन गोगोई निकाल देताना अक्षयची आनंदित प्रतिक्रिया या मिम्सना इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुकवर उधाण आले होते. मिम्सच्या माध्यमातून सरकारला ‘अहो मंदिर, मशीद बनवाल, परंतु शहरातील रस्ते कधी बुजवणार’ असा सवालही नेटकरी करत आहेत.