अयोध्येत उभारण्यात येत असलेल्या राम मंदिराच्या जमीन खरेदी प्रकरणावरून वादंग निर्माण झालं. आपचे खासदार आणि राष्ट्रीय प्रवक्ते संजय सिंह आणि समाजवादी पार्टी सरकारमधील मंत्री आणि अयोध्येचे माजी आमदार पवन पांडे यांनी श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टवर गंभीर आरोप केलेला आहे. ट्रस्टने राम मंदिरासाठी दोन कोटींची जमीन १८ कोटींना घेतल्याचा आरोप या दोन्ही नेत्यांनी केला असून, यावर श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने खुलासाही केला आहे. दरम्यान, या वादावरून राष्ट्रवादीचे आमदार आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी भाजपा कार्यकर्त्यांसह समर्थकांवर निशाणा साधला आहे.

राम मंदिर जमीन भ्रष्टाचाराचा नेमका वाद काय?

आम आदमी पार्टीचे राज्यसभा सदस्य आणि पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते संजय सिंह यांनी अयोध्येत उभारण्यात येत असलेल्या राम मंदिराचं काम पाहणाऱ्या श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत. ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी संस्थेचे सदस्य अनिल मिश्रा यांच्या मदतीने २ कोटी किंमत असणारी जमीन १८ कोटी रुपयांना खरेदी केली. हे सरळ भ्रष्टाचाराचं प्रकरण असून सरकारने याची चौकशी सीबीआय आणि ईडीमार्फत करावी, अशी मागणी त्यांनी केलेली आहे. तर दुसरीकडे समाजवादी पार्टीचे नेते आणि अयोध्येचे माजी आमदार पवन पांडे यांनीही असाच आरोप केला आहे. “बाबा हरिदास यांनी ही जमीन सुलतान अन्सारी आणि रवि मोहन तिवारी यांना विकली. त्यानंतर त्यांनी ही जमीन राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट विकली. काही मिनिटांत जमिनीचा भाव दोन कोटींहून १८.५ कोटी कसा होऊ शकतो. अयोध्येचे महापौर ऋषिकेश उपाध्याय आणि ट्रस्ट विश्वस्त अनिल मिश्रांच्या उपस्थितीत हा व्यवहार झाला. १७ कोटी तत्काळ खात्यावर जमा करण्यात आले. हे पैसे कुणी दिले आणि ते कुणाच्या खात्यात जमा करण्यात आले, याची सीबीआयने चौकशी करावी,” अशी मागणी पांडे यांनी केली आहे.

हेही वाचा- Ayodhya Land Deal: १८ कोटींमध्ये जमीन घेतली? ; ट्रस्टने भाजपा व आरएसएसला पाठविला अहवाल

जितेंद्र आव्हाडांचं एका ओळीत भाष्य

या वादावरून भाजपाविरुद्ध विरोधी पक्ष असा वादंग निर्माण झालं आहे. सोशल मीडियावर याचे पडसाद उमटताना दिसत असून, भाजपा कार्यकर्ते आणि समर्थकांना जितेंद्र आव्हाड यांनी लक्ष्य केलं आहे. “तिवारीसाठी अन्सारीचीही बाजू घेऊन भक्तांना लढावं लागत आहे. दुर्दैवी बिचारे! अयोध्या_जमीन_घोटाळा,” असं म्हणत आव्हाड यांनी उपरोधिक टीका केली आहे.

ट्रस्टनं आरोप फेटाळले, केला खुलासा…

या आरोपांवर बोलताना ट्रस्टचे सचिव चंपत राय यांनी म्हणाले, “श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने मंदिरासाठी कमीत कमी दराने जमीन खरेदी केली आहे. काही राजकीय नेते लोकांची दिशाभूल करत आहेत. आरोप करणारे लोक राजकारणाशी संबंधित असून, राजकीय द्वेषातून आरोप करत आहेत. हे समाजाची दिशाभूल करण्यासाठी केलं जात आहे. ९ नोव्हेंबर २०१९ रोजी सर्वोच्च न्यायालयाने राम मंदिरासंदर्भातील मुद्द्यावर निकाल दिल्यानंतर देशभरातून लोक अयोध्येत जमीन खरेदीसाठी येऊ लागले. त्यामुळे जमिनीचे भाव वाढले. ज्या प्लॉटची माध्यमांमध्ये चर्चा होत आहे, ती जागा रेल्वे स्थानक परिसराजवळ असलेली मोक्याची जागा आहे. श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट मंदिरासाठी आतापर्यंत जी जमीन खरेदी केली, कमीत कमी किंमतीत खरेदी केली आहे,” असं राय यांनी म्हटलं होतं.