आझाद मैदान हिंसाचार प्रकरणी मुंबई गुन्हे शाखेने मदिन उल इल्म या संघटनेचा सरचिटणीस अहमद रझा याला सोमवारी अटक केली. चौकशीसाठी बोलावल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. रॅलीच्या आयोजकांची ही पहिलीच अटक आहे.
अहमद रझा याचे नाव आरोपपत्रात समाविष्ट होते. यापूर्वी त्याला दोन वेळा चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. त्याला मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचे अतिरिक्त पोलीस आयुक्त (गुन्हे) निकेत कौशिक यांनी सांगितले. पुरवणी आरोपपत्रात त्याच्यावरील आरोप निश्चित करण्यात येणार आहेत. अहमद रझा याने मुंबई पोलिसांकडे ११ ऑगस्टच्या रॅलीची परवानगी मागणारे पत्र दिले होते. या सभेला फक्त एक हजार माणसे येतील, असे त्याने पोलिसांना सांगितले होते. परंतु प्रत्यक्षात ५० हजारांहून अधिक लोक या सभेला उपस्थित होते. त्याने अनेक नियमांचे उल्लंघन केल्याचे सहपोलीस आयुक्त (गुन्हे) हिमांशू रॉय यांनी सांगितले.
रॅलीत झालेल्या हिंसाचारात दोघांचा मृत्यू झाला होता तर ९२ जण जखमी झाले होते. या प्रकरणात आता अटक झालेल्यांची संख्या ६४ झाली आहे. त्यापैकी ५ जणांना न्यायालयाने पुराव्या अभावी यापूर्वीच निर्दोष सोडले आहे. तर ४५ जणांना जामीन मंजूर झाला आहे. या हिंसाचार प्रकरणात मुंबई पोलिसांनी एकूण ३ हजार ५०० जण फरार दाखविले आहेत.  आझाद मैदानात मदिन उल इल्म या संघटनेच्या पुढाकाराने प्रार्थना सभा आयोजित करण्यात आली होती. घाटकोपर येथील भंगार व्यापारी रिझवान खान आणि कुर्ला येथील मौलाना अहमद रजा यांनी ही संघटना स्थापन केली होती.  एकूण १३ संघटनांनी मिळून ही रॅली आयोजित केली होती. त्यापैकी १२ संघटनांची नोंदणी झालेली नव्हती. यापैकी बहुतांश संघटना या कुर्ला आणि घाटकोपर परिसरातल्या आहेत. यापैकी केवळ रझा अकादमीकडे रॅली काढण्याचा अनुभव होता. मदिन उल इल्म या संघटनेकडे कसलाच अनुभव नव्हता. कुर्ला येथील एका भाडय़ाच्या खोलीत त्यांनी छोटेसे कार्यालय थाटले होते. ‘इंग्लिश स्पिकिंग’चे वर्ग चालवणे आणि इस्लामिक धर्माचे मार्गदर्शन करण्याचे काम ही संघटना करत होती. ७ ऑगस्टला मुंबई सेंट्रलच्या क्रिस्टल टॉवर येथे मदिन उलने बैठक बोलावून अनेक सुन्नी नेत्यांना आमंत्रित केले होते. ऑल इंडिया उलेमा कौन्सिलने मदत करण्याचे नाकारल्याने या संघटनांच्या प्रतिनिधींनी रझा अकादमीकडे धाव घेतली. ११ आणि १३ ऑगस्टला प्रार्थना सभा आयोजित करण्याचे सुरुवातीला ठरले होते. या संघटनांनी आसाम आणि म्यानम्यारमधील मुस्लीम बांधवांवर झालेल्या अत्याचाराविरोधात एकत्र येण्यासाठी पाच लाखांहून अधिक एसएमएस पाठविले होते.