|| संदीप आचार्य

बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रस्ताव सादर

केवळ पुण्यासाठी नव्हे तर संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रातील रुग्णांसाठी महत्त्वाच्या असलेल्या बी. जे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने स्वायत्तता मिळावी यासाठी राज्य शासनाकडे प्रस्ताव सादर केला आहे. चार वर्षांपूर्वी ग्राँट वैद्यकीय महाविद्यालय व जे.जे. रुग्णालयानेही स्वायत्ततेसाठी अर्ज केला होता. या दोन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांव्यतिरिक्त औरंगाबाद नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांनीही स्वायत्ततेसाठी प्रस्ताव सादर करण्याचा निर्णय घेतला असून वैद्यकीय शिक्षण मंत्रालयाने स्वायत्तता देण्याची भूमिका घेतल्यामुळे दर्जेदार शासकीय वैद्यकीय शिक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना स्वायत्तता देण्याबाबत यापूर्वीचे सरकार सकारात्मक नसल्यामुळे मुंबई महापालिकेच्या केईएम रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयाला स्वायत्तता मिळू शकली नव्हती. त्याचप्रमाणे जे.जे. रुग्णालय व ग्राँट वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्वायत्ततेचा प्रश्नही गेल्या चार वर्षांपासून प्रलंबित आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी शासकीय वैद्यकीय शिक्षण व संशोधन दर्जेदार होण्याच्या दृष्टीने महाविद्यालयांना स्वायत्तता मिळायला हवी अशी भूमिका घेतली. त्यामुळे १९४६ पासून कार्यरत असलेल्या पुण्याच्या बी. जे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने आपल्याला स्वायत्तता मिळावी असा प्रस्ताव वैद्यकीय शिक्षण सचिवांकडे दोन दिवसांपूर्वी सादर केला.

गेल्या सात-आठ वर्षांत या महाविद्यालयाने सीएसआर तसेच दानशूर व्यक्ती व संस्थांच्या माध्यमातून तब्बल ८५ कोटी रुपये वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील अनेक विभागांच्या अत्याधुनिकीकरणासाठी मिळवले. या ८५ कोटींच्या निधीतून डायलिसीस सेवा विभाग, नवजात अर्भकांसाठी अत्याधुनिक ५९ खाटांचा अतिदक्षता विभाग, सर्व बाह्य़ रुग्ण विभागांचे एकत्रीकरण करून एकाच ठिकाणी निर्मिती, अपघात विभाग व ट्रॉमा विभागाची निर्मिती, अत्याधुनिक एमआरआय, सीटी स्कॅन तसेच अल्ट्रा सोनोग्राफी मशीन घेतले. याशिवाय पुण्यातील प्रसिद्ध दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या माध्यमातून रुग्णांना उत्तम प्रकारचे जेवण देण्यासाठी अत्याधुनिक भोजनगृहाची उभारणी केली. शंभर नर्सिग होम उभारण्याबरोबरच सीएसआर निधीतून रुग्णालयातील सर्व विभागांचे बळकटीकरण करण्यात आल्याचे रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांनी सांगितले.

बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयात पदवीच्या २०० जागा असून १५९ पदव्युत्तर प्रवेश आहेत. जवळपास वर्षांकाठी येथे सात लाख रुग्णांवर बाह्य़ रुग्ण विभागात उपचार करण्यात येत असून तेवढय़ाच रुग्णांना रुग्णालयात दाखल करून उपचार केले जातात. जवळपास नऊ हजार बाळंतपणे, ४१ हजार छोटय़ा-मोठय़ा शस्त्रक्रिया, हृदय विभागाच्या सुमारे २३ हजार रुग्णांवर अँजिओप्लास्टी व शस्त्रक्रिया आदी उपचार करण्यात येतात. रुग्णांच्या वर्षांकाठी साडेबारा लाख चाचण्या केल्या जातात. याशिवाय सहा हजार शवविच्छेदन ससून रुग्णालयात करण्यात येतात. वैद्यकीय महाविद्यालय व ससून रुग्णालयाचा अर्थसंकल्प सुमारे १८० कोटी रुपयांचा असून सव्वादोन एकरांवर पसरलेल्या या महाविद्यालयात संशोधनाला मोठा वाव आहे. वैद्यकीय क्षेत्रातील नवनवे संशोधन करण्यासाठी या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला स्वायत्तता मिळणे गरजेचे असल्यानेच आम्ही स्वायत्तता मिळण्यासाठी प्रस्ताव सादर केल्याचे अधिष्ठाता डॉ. चंदनवाले यांनी सांगितले.

स्वायत्तता मिळाल्यास स्वतंत्र अभ्यासक्रमांपासून वैद्यकीय संशोधनाच्या अनेक उपक्रमांना गती देता येईल, असेही डॉ. चंदनवाले यांनी सांगितले. सरकारनेच चार शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना स्वायत्तता देण्याची भूमिका घेतली असून यातून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना अधिक चांगल्या प्रकारे काम करता येईल, असा विश्वास वैद्यकीय शिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी व्यक्त केला.