|| संदीप आचार्य

महाराष्ट्रात कर्करुग्णांची संख्या वेगाने वाढत असून पश्चिम महाराष्ट्रातील कर्करुग्णांची गरज लक्षात घेऊन शासनाच्या पुणे येथील बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयाने तब्बल ७०० कोटी रुपये खर्चून सुसज्ज कर्करुग्णालय उभारण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी प्रकल्प आराखडा तयार करण्यात आला असून जमीन ताब्यात घेण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे.

बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय व ससून रुग्णालय हे केवळ पुण्याच्याच नव्हे तर संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रातील गोरगरीब रुग्णांसाठी एक आधारस्तंभ बनले आहे. वर्षांकाठी जवळपास सात लाख रुग्णांवर येथे उपचार करण्यात येत असून गेल्या काही वर्षांत जवळपास बाराशेहून अधिक कर्करुग्णांवर येथे उपचार केले गेले. कर्करुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने अत्याधुनिक कर्करुग्णालय उभारण्याची योजना तयार केली. यासाठी रुग्णालयाच्या परिसराला लागून असलेली जागा विकसित करून त्या ठिकाणी सुसज्ज कर्करुग्णालय उभारण्यात येणार आहे. या जागेवर असलेल्या सुमारे अठरा झोपडय़ा अन्यत्र स्थलांतरित करून राज्य रस्ते विकास महामंडळाच्या ताब्यातून सदर जागा घेण्याचे काम अंतिम टप्प्यात आल्याचे डॉ. चंदनवाले यांनी सांगितले. गेली दोन वर्षे जागा मिळविण्यासाठी पाठपुरावा करण्यात आला असून केंद्र सरकारकडे कर्करुग्णालयाच्या उभारणीसाठी प्रस्तावही पाठविण्यात आला आहे. कर्करोगाचे एकूण आठ विभाग सुरू करण्यात येणार असून ३६० खाटांचे हे रुग्णालय असणार आहे. ७०० कोटींच्या या प्रकल्पात बांधकामाचा खर्च सुमारे ४१९ कोटी रुपये असून १७४ कोटी रुपयांची अत्याधुनिक उपकरणे घेण्यात येणार आहेत. याशिवाय नव्याने नियुक्त करावयाच्या कर्मचाऱ्यांसाठी ३० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून यातून पुण्यातील तसेच अन्यत्र असलेल्या क र्करोगतज्ज्ञांची नियुक्ती केली जाणार आहे. सव्वादोन एकरांवर उभ्या राहणाऱ्या या भव्य रुग्णालयाचे एकूण बांधकाम ३९ हजार चौरस मीटर असेल, असेही डॉ. चंदनवाले यांनी सांगितले.

या भव्य प्रकल्पाची योजना आखण्यात डॉ. रमेश भोसले, डॉ. दिलीप कदम, श्रीकांत पवार यांच्यासह बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयातील तज्ज्ञ डॉक्टरांनी मोलाची मदत केल्याचे डॉ. चंदनवाले यांनी सांगितले. या कर्करुग्णालयासाठी मेडिकल आँकॉलॉजी, सर्जिकल आँकॉलॉजी, पेडियाट्रिक आँकॉलॉजी, आँको हिमॅटॉलॉजी, हेड नेक आँकॉलॉजी, न्युक्लिअर मेडिसिन आदी पंधरा विषयांतील प्राध्यापकांची नियुक्ती केली जाणार आहे. आजच बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय व ससून रुग्णालयात वर्षांकाठी बाराशे नवीन कर्करुग्ण दाखल होत असतात. स्वतंत्र अत्याधुनिक कॅन्सर रुग्णालय ही केवळ पुण्याचीच नव्हे तर पश्चिम महाराष्ट्राची गरज असून या रुग्णालयाच्या उभारणीसाठी सेवाभावी संस्थांसह विविध कंपन्यांचीही मदत घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. तीन वर्षांपूर्वी टाटा कॅन्सर रुग्णालयात एका कार्यक्रमासाठी उपस्थित असताना टाटा कॅन्सर रुग्णालयात येणारा कर्करुग्णांचा ओघ बघून बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयाचे कॅन्सर रुग्णालय उभारण्याची संकल्पना सुचली असून जागा हस्तांतरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर थोडय़ाच काळात हे सुसज्ज कर्करोग उपचार रुग्णालय आम्ही उभारू, असा विश्वासही डॉ. चंदनवाले यांनी व्यक्त केला.