मराठी रंगभूमीवर संगीत नाटकांची निर्मिती कमी प्रमाणात होते आहे. आजच्या युवा पिढीपर्यंत संगीत नाटक पोहचण्याची गरज आहे. त्यामुळे संगीत नाटकांचे पुनरुज्जीवन करून या मराठी रंगभूमीवर संगीत नाटकांना जुने वैभव प्राप्त करून देऊ अशी घोषणा राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी केली. नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्काराने आज बाबा पार्सेकर यांचा सन्मान करण्यात आला. तसेच अण्णासाहेब किर्लोस्कर रंगभूमी जीवनगौरव पुरस्काराने निर्मला गोगटे यांना गौरवण्यात आले याच कार्यक्रमात विनोद तावडे बोलत होते.ज्येष्ठ रंगकर्मी लीलाधर कांबळीच्या हस्ते बाबा पार्सेकर यांना तर ज्येष्ठ रंगकर्मी रजनी जोशी यांच्या हस्ते निर्मला गोगटे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.

संगीत नाटक क्षेत्रातील ज्येष्ठ कलावंतांचे योगदान अनन्यसाधारण आहे. ज्येष्ठ कलाकारांमुळे आपली रंगभूमी समृद्ध झाली आहे असेही विनोद तावडे यांनी म्हटले आहे. तसेच येत्या काळात संगीत नाटकांचे पुनरुज्जीवन करण्यावर जास्त भर देणार असल्याचेही तावडे यांनी स्पष्ट केले. संगीत नाट्य क्षेत्रातील कलाकार, निर्माते यांच्यासोबत बैठक पार पडल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच संगीत नाटकांच्या निर्मितीसाठी ज्येष्ठ कलाकारांचे मार्गदर्शन घेणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

पुरस्कार वितरणानंतर बाबा पार्सेकर आणि निर्मला गोगटे यांनीही आपले मनोगत मांडले. सरकारने आमच्या कलेचा गौरव केला असल्याचे मत या दोघांनीही मांडले. तसेच संगीत नाटकांना जुने वैभव प्राप्त करून देण्याचा सरकारचा उपक्रम कौतुकास्पद असल्याचेही मत त्यांनी मांडले. सोमवारी झालेल्या सोहळ्याला आमदार प्रविण दरेकर, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक संजय पाटील यांच्यासह इतर मान्यवरांचीही उपस्थिती होती.