बेहिशेबी संपत्ती जमा केल्याच्या आरोपावरून लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याअंतर्गत दोषी ठरविण्यात आलेले शिवसेनेचे देवळाली येथील आमदार बबनराव घोलप यांनी आपल्याला दोषी ठरवण्यास स्थगिती देण्याची मागणी उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे.
त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूक लढविण्याचा त्यांचा मनसुबा तूर्त तरी धुळीस मिळाला आहे. घोलप यांच्याकडे सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्याचाच मार्ग आता शिल्लक आहे. या निर्णयाची तपशीलवार कारणमीमांसा नंतर देण्यात येईल, असे न्यायालयाने स्पष्ट केले. बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी तीन वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा झालेल्या घोलप यांच्या अपात्रतेचा आदेश राज्यपालांनी काढल्यानंतर घोलप यांच्या निवडणूक लढविण्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. विशेष न्यायालयाने २१ मार्च रोजी दोषी ठरवून शिक्षा ठोठावल्यावर घोलप यांनी उच्च न्यायालयात निर्णयाला आव्हान दिले होते. नुकतेच न्यायालयाने त्यांचे अपील सुनावणीसाठी दाखल करून घेतले.त्यात जामिनासाठी एक आणि दोषी ठरविणारा विशेष न्यायालयाचा निकाल स्थगित करण्यासाठी दुसरा अर्ज केला होता. त्यांचा जामिनाचा अर्ज न्यायालयाने आधीच मंजूर केल्याने घोलप सध्या जामिनावर बाहेर आहेत.
‘चुकीचा संदेश जाईल’
घोलप हे लोकप्रतिनिधी आहेत. त्यामुळे लोकप्रतिनिधीच्या दोषीत्वास स्थगिती दिली तर लोकांमध्ये चुकीचा संदेश जाऊ शकतो, असे स्पष्ट करीत न्यायमूर्ती जाधव यांनी त्यांची दोषीत्वास स्थगिती देण्याची मागणी फेटाळून लावली.