भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनी येत्या ६ डिसेंबर रोजी त्यांना शासकीय मानवंदना देण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी सांगितले.
महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी आणि शिवाजी पार्क मैदानात करावयाच्या विविध उपाययोजना आणि पुरवण्यात येणाऱ्या सुविधांचा आढावा घेण्यासाठी फडणवीस यांनी त्यांच्या मंत्रालयातील दालनात बैठक बोलावली होती. या बैठकीस सहकार मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार आशीष शेलार यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले, बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनी शासकीय मानवंदना दिली जाईलच याशिवाय याठिकाणी हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी देखील करण्यात येईल. यासाठी आवश्यक ती तयारी करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या.
विविध विभागांनी परस्परांशी समन्वय ठेवून चैत्यभूमी आणि शिवाजी पार्कवर चोख व्यवस्था ठेवावी, असे सांगून फडणवीस यांनी चैत्यभूमीवर अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या लाखो नागरिकांसाठी आवश्यक त्या सोयी-सुविधा पुरविण्याचे आदेशही या बैठकीत दिले.