‘व्यंगदर्शन’ संमेलनात बाबासाहेब पुरंदरे यांचे उद्गार

व्यंगचित्रकला ही ईश्वरी प्रतिभेचीच देणगी असून या कलेला जपायला हवे, असे प्रतिपादन शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी शनिवारी ‘कार्टूनिस्ट कंबाइन’ या संस्थेतर्फे दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात आयोजित ‘व्यंगदर्शन २०१६’ या संमेलनात केले. पुरंदरे यांच्या हस्ते ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि. द. फडणीस आणि वसंत सरवटे यांचा जीवनगौरव पुरस्काराने गौरव करण्यात आला. प्रकृती अस्वास्थ्यामुळे सरवटे उपस्थित नसल्याने त्यांच्या मुलींनी हा पुरस्कार स्वीकारला. पुरस्कारात मानचिन्ह आणि ५० हजार रुपयांचा समावेश होता.

लेखकांप्रमाणेच व्यंगचित्रकारांनाही प्रतिभेचे देणे लाभले असते. त्यामुळे साहित्य संमेलनांप्रमाणेच व्यंगचित्रकलेचीही संमेलने झाली पाहिजेत, असे बाबासाहेब यावेळी म्हणाले. आपल्या कलेमुळे आपण लोकांना किती आनंद देत आहोत, याची खुद्द व्यंगचित्रकारांनाही कल्पना नसेल. त्यामुळे जगाला हसवणारे, आनंद देणारे बाजूला राहता कामा नयेत, अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

व्यंगचित्रकारांच्या या पहिल्याच संमेलनाला राज्यभरातून आलेल्या नवोदित व्यंगचित्रकारांची तसेच चित्ररसिकांची तुडुंब गर्दी होती. फडणीस आणि सरवटे या दोघांना प्रत्यक्ष पाहाता आणि ऐकता येणार म्हणून तसेच संमेलनाचे उद्घाटन मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या हस्ते होणार असल्याने व्यंगचित्रकार नेत्याचे शाब्दिक फटकारेही अनुभवता येणार म्हणून उपस्थितांमध्ये अपार उत्सुकता होती. सरवटे यांच्या उपस्थितीची उणीव भासत होती, मात्र आपल्या व्यंगचित्रांइतक्याच लोभस आणि प्रसन्न व्यक्तिमत्त्वाचे दर्शन फडणीस यांच्या भाषणातूनही घडल्याने उपस्थित भारावून गेले होते.

चित्राच्या एका रेषेतही हजारो शब्दांचा ऐवज सामावू शकतो. त्यामुळे चित्र लहान असले तरी चालेल, परंतु मनाचा कॅनव्हास मात्र मोठा ठेवा, असा सल्ला फडणीस यांनी नवोदित चित्रकार तसेच व्यंगचित्रकारांना दिला. समाजातील व वैयक्तिक जीवनातील व्यंगचित्रकलेचे स्थान आणि मर्म मोजक्या शब्दांत उलगडत असतानाच सरवटे यांच्याबरोबरच्या आठवणींनाही त्यांनी उजळा दिला.

ते म्हणाले की, सरवटे यांच्याबरोबर गेली सत्तर वर्षे माझे मैत्र आहे. कोल्हापूरमध्ये तर आम्ही एकत्र लॅण्डस्केप काढण्यासाठीही जात असू. तसेच एका वर्तमानपत्राने घेतलेल्या कथास्पर्धेसाठीही आम्ही दोघांनी कथा लिहिल्या होत्या. त्यात यश मात्र आले नाही.

तेव्हाच आम्हाला आमची ‘लाइन’ वेगळी असल्याचे समजून आले! मग शब्दांच्या मागे जाण्यापेक्षा रेषा जपायचा निर्णय आम्ही घेतला. मी रेखाटलेली व्यंगचित्रे तुम्हाला कशी वाटली, असा प्रश्न मी रसिकांना गेली साठ वर्षे नेहमीच विचारत आलो. आज या पुरस्काराच्या निमित्ताने रसिकांना विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर मला मिळाले आहे, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.

संमेलनाच्या प्रास्ताविकात व्यंगचित्रकार चारुहास पंडित यांनी या क्षेत्रात तरुण आणि स्त्रियांचे प्रमाण कमी असल्याबद्दल खंत व्यक्त केली. या क्षेत्रात तरुणांचा सहभाग वाढत जाईल आणि पुढच्या वर्षी ‘व्यंगदर्शन’ला ‘यंगदर्शन’चेही रूप येईल, अशी आशा त्यांनी व्यक्त करताच उपस्थितांत हास्याची लकेर उमटली. संमेलनाचा रविवारी अखेरचा दिवस आहे.

चित्राच्या एका रेषेतही हजारो शब्दांचा ऐवज सामावू शकतो. त्यामुळे चित्र लहान असले तरी चालेल, परंतु मनाचा कॅनव्हास मात्र मोठा ठेवा.  – शि. द. फडणीस