डोंबिवलीत सकाळी साडे दहा वाजताचा कार्यक्रम असल्याने शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे वेळेवर कार्यक्रम स्थळी हजर झाले. कार्यक्रमाचे मुख्य पाहुणे शिवसेना पदाधिकारी वेळेत न आल्याने कार्यक्रम नियोजित वेळेपेक्षा एक तास उशीरा सुरू झाला. एक तास ताटकळत बसावे लागल्याने पुरंदरे यांनी कार्यक्रम सुरू होताच पहिली दहा मिनिटे संयोजक शिवसैनिकांची खरडपट्टी काढली.
युवा प्रतिष्ठान, कर्नाळा ट्रस्ट आणि शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी ‘देशभक्त कोशाचे’ प्रकाशन व त्याचे शाळांना वाटप कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाला उशिरा येऊन आमदार एकनाथ शिंदे यांनी भाषण केले. कार्यक्रमाच्या मध्यावरच त्यांनी व्यासपीठ सोडून जाणे पसंत केले. या वेळीही पुरंदरे यांनी शिंदे यांना टोला हाणताना ‘असे मध्येच कार्यक्रमातून जायाचे नसते, जायाचे असेल तर मी नेहमी कार्यक्रम ठिकाणी मागच्या खुर्चीवर बसत असे’. महापौर कल्याणी पाटीलही कार्यक्रमस्थळी उशिरा दाखल झाल्या. ‘वेळ न पाळणे हा देशद्रोह आहे, इंग्रजांनी वेळेची गणिते पाळली म्हणून ते यशस्वी झाले. त्यांनी कधी देशद्रोह केला नाही. त्यांच्याकडे खरी देशभक्ती होती, असे सांगत आपण जन्मजात देशद्रोही आणि गुन्हेगार आहोत. ‘इंडियन टाइम’ला मूठमाती देणार की नाही असा सवाल शिवशाहिरांनी यावेळी उपस्थित केला. दिखाऊपणा, खोटी प्रसिध्दी हा स्थायीभाव झाला आहे. शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठी मावळे जमा केले. कोणालाही आश्वासने दिली नव्हती. तरी ते निष्ठेने, प्राणपणाने लढले. आता देशभक्त माणसे शोधावी लागतात. पहिले मन स्वदेशी करा, मग देश स्वदेशी होईल, असेही त्यांनी सांगितले. आमदार म्हणून निवडून आलेला व्यक्ती पद नाही म्हणून पक्ष सोडतो. ही कसली निष्ठा अशी ‘आम आदमी’च्या आमदारावरही त्यांनी टीका केली.