अतिदक्षता विभागात विचित्र अपघात

केईएम रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात (पीआयसीयू) बुधवारी मध्यरात्री घडलेल्या विचित्र अपघातात दोन महिन्यांचे बालक १५ ते २० टक्के भाजले. या बालकाची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांनी सांगितले. हृदयविकार आणि छातीतील संसर्गाच्या तक्रारीनंतर या बालकाला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तपासणीनंतर बालकावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू करण्यात आले.

अपघात घडला तेव्हा ते बालक ‘व्हेंटिलेटर’वर होते. मध्यरात्री दोनच्या सुमारास ‘ईसीजी लीड’मधून ठिणग्या (स्पार्क) उडाल्या आणि गादीने पेट घेतला. विभागात उपस्थित डॉक्टर, परिचारिकांनी तातडीने आग विझवली. मात्र तोवर बालकाचे डोके, खांदा आणि डावा हात भाजला. डॉ. देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार, दररोज असंख्य रुग्णांवर ‘ईसीजी लीड्स’ लावले जातात. मात्र आजतागायत त्यातून अशा प्रकारे ठिणग्या उडणे किंवा पेट घेणे आदी प्रकार ऐकिवात नाहीत. त्यामुळे बुधवारी मध्यरात्री घडलेला अपघात कल्पनेपलीकडील होता. रुग्णालयाने अपघाताची माहिती भोईवाडा पोलिसांना दिली. मात्र जखमी बालकाच्या पालकांनी तक्रार दिलेली नाही, असे भोईवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विनोद कांबळे यांनी सांगितले.