बाळचोरीचे आणखी गुन्हे केल्याचा संशय

लोकसत्ता खास प्रतिनिधी

मुंबई : जुहूतील पदपथावरून चोरलेले बाळ तेलंगणातील दाम्पत्याला चार लाखांत विकणाऱ्या डॉक्टरने याआधीही अशा प्रकारचे आणखी गुन्हे केले असावेत, असा संशय पोलिसांना आहे. तसेच या डॉक्टरच्या पदवीबाबतही जुहू पोलिसांना संशय आहे. त्यादृष्टीने डॉक्टरकडे कसून चौकशी सुरू आहे.

डॉ. महोम्मद बशीरुद्दीन असे डॉक्टरचे नाव असून तो तेलंगणा येथे वैद्यकीय काम करतो. मूल होत नसल्याने उपचारासाठी येणाऱ्या दाम्पत्याला त्याने दत्तक घेण्याचा सल्ला दिला होता. सर्व कायदेशीर प्रक्रि या पूर्ण करून अधिकृ तरीत्या बाळ दत्तक घेऊन देतो, असे सांगून डॉ. बशीरुद्दीनने या दाम्पत्याकडून चार लाख रुपये घेतले होते. अन्य अटक आरोपींपैकी एक तरुण तेलंगणाचा रहिवासी आणि डॉ. बशीरुद्दीनचा परिचित होता. त्याला हाताशी धरून बशीरुद्दीनने हा गुन्हा के ला.

दाम्पत्याची समजूत

स्थानिक पोलिसांनी बशीरुद्दीनला ताब्यात घेतले. त्यानंतर जुहू पोलीस दाम्पत्याच्या घरी गेले, मात्र तोपर्यंत हे दाम्पत्य बाळाला घेऊन अन्य ठिकाणी निघून गेले. गावकऱ्यांच्या मदतीने या दाम्पत्याला पुन्हा बोलावण्यात आले. सुमारे तीन ते चार तास जुहू पोलिसांनी त्यांची समजूत घातली. मात्र अधिकृ तरीत्या हे बाळ दत्तक घेतले आहे. डॉ. बशीरुद्दीन यांनी सर्व प्रक्रि या पूर्ण के ली आहे, यावर ते ठाम होते. अखेर पोलिसांनी दाम्पत्यासमोर बशीरुद्दीनची चौकशी के ली. त्यात त्याने गुन्हा कबूल केला.

पोलीस कोठडी

न्यायालयाने याप्रकरणी अटक के लेल्या तिन्ही आरोपींना २३ नोव्हेंबपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. कोठडीतील चौकशीत या गुन्ह्य़ासोबत अशाप्रकारच्या अन्य गुन्ह्य़ांबाबत चौकशी के ली जाईल, असे जुहू पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक पंढरीनाथ वाव्हळ यांनी सांगितले.

रिक्षाच्या संशयास्पद हालचालीमुळे धागेदोरे

चोरी झालेल्या बाळाचा शोध एका रिक्षाच्या संशयास्पद हालचालींमुळे जुहू पोलीस ठाण्यातील अन्वेषण पथकाने लावला. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये रिक्षा दिसत असली तरी रात्र असल्याने नोंदणी क्रमांक मात्र स्पष्ट दिसत नव्हता. अखेर पोलीस पथकाने अंधेरी, जुहू परिसरांत रात्रपाळीत रिक्षा चालविणाऱ्या सुमारे दीडशे चालकांकडे चौकशी के ली. त्यातून रिक्षाचालक आणि बशीरुद्दीनच्या परिचित तरुणाला पोलीस पथकाने ताब्यात घेतले. दोघांच्या चौकशीतून बाळाची तेलंगणामधील एका दाम्पत्याला विकल्याची माहिती पुढे आली. त्यानुसार पोलीस पथक तातडीने तेलंगणासाठी निघाले, मात्र तेथे गेल्यावरही अपहृत बाळ सहजासहजी पोलीस पथकाच्या हाती लागले नाही.