काँग्रेसचे मुंबईत आंदोलन; सरकार, महापालिकेचा निषेध

राज्य सरकार आणि मुंबई महापालिका प्रशासनाच्या विरोधात मुंबई काँग्रेसच्या वतीने गुरुवारी मुंबईत ‘चला खड्डे मोजू या’, असे अनोखे आंदोलन करण्यात आले. मुंबई महापालिकेच्या गैरकारभारामुळे शहरातील रस्त्यांवर खड्डे आहेत. मुंबईकरांना त्याचा  त्रास सहन करावा लागत आहे, महापालिकेला मात्र त्याचे कसलेही गांभीर्य नाही, अशी टीका मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी केली.

मुंबई काँग्रेसच्या वतीने निरुपम यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत  करण्यात आलेल्या खड्डे मोजा आंदोलनात पक्षाचे  कार्यकर्ते मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते. मंबईतील सर्व खड्डे महापालिका बुजविणार नाही, तोपर्यंत वेगवेगळ्या विभागांत खड्डे मोजा आणि बुजवा हे आंदोलन चालूच राहील, अशी माहिती संजय निरुपम यांनी दिली.  राज्य सरकार आणि महापालिकेतील सत्ताधारी शिवसेना मुंबईकरांना भेडसावणाऱ्या खड्डय़ांच्या समस्येकडे पूर्णपणे दुर्लक्ष करीत आहे. मुंबईकरांच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी आणि झोपलेल्या भाजप सरकारला जागे करण्यासाठी काँग्रेसला खड्डे मोजा हे अनोखे आंदोलन करावे लागत आहे, असे त्यांनी सांगितले.