मान, पाठ, कंबर आणि पायाच्या सांध्यामध्ये दुखापतींचे रुग्ण ४० टक्क्य़ांनी अधिक

पावसाळ्यामध्ये मान, पाठ, कंबर आणि पायाच्या खालच्या सांध्यामध्ये दुखापत झालेल्या रुग्णांची संख्या सुमारे ४० टक्क्य़ांनी वाढली आहे. यामध्ये २० ते ४० वयोगटातील रुग्ण असून तरुणांचे प्रमाण सर्वाधिक आहे. रस्त्यावरून चालताना खड्डय़ांमुळे तोल गेलेले वयोवृद्धही रुग्णालयात येत असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले.

खड्डय़ांमुळे दुचाकीस्वार पाठ आणि मानदुखीच्या त्रासाने हैराण होत आहेत. खड्डय़ातून गाडी जाताना पाठीच्या मणक्यांवर ताण येऊन वेदना बळावते. बऱ्याचदा पाठदुखी विकोपाला जाते, असे जीटी रुग्णालायातील अस्थिभंग विभागाचे प्रमुख डॉ. धीरज सोनावणे यांनी सांगितले.

खड्डय़ांमधून सातत्याने गाडी चालविल्याने मणक्यावर ताण येऊन त्यांची झीज होऊ लागते. मणक्यातील हाडांमधील ताण सोसणारा लवचिक भाग सरकतो. अशा परिस्थितीत शस्त्रक्रिया करून मणक्यामधील दाबही काढावा लागतो. तरीही रुग्णाला पाठदुखीचा त्रास आयुष्यभर राहतोच, असेही डॉ. सोनावणे यांनी सांगितले.

पावसाळ्यात पादचाऱ्यांच्याही आरोग्य तक्रारींत वाढ होते. अनेकजण पायाच्या खालच्या बाजूच्या सांध्यामध्ये दुखापत झाल्याच्या तक्रारी घेऊन येत असतात. यात वयोवृद्धांचे प्रमाण अधिक आहे. खड्डय़ातून चालताना तोल जाऊन पाय मुरगळणे, घोटय़ाजवळ सूज येणे. घोटय़ाजवळील भागामध्ये अस्थिभंग होणे अशा गोष्टी त्यांच्या बाबतीत घडतात, असे अस्थिभंग शल्यविशारद डॉ. आदित्य खेमका यांनी सांगितले.