खड्डय़ांमुळे प्रवासाच्या वेळत कमालीची वाढ होत असल्याने मुंबईकर हैराण आहेतच, पण त्यांना विविध आरोग्यसमस्याही भेडसावत आहेत.  वाहतूक कोंडीमुळे पायदुखी, पाठदुखीपासून मूत्रमार्गसंसर्गापर्यंतच्या समस्या बळावत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. अडीच- तीन तास लघवी तुंबवून ठेवणे हे कोणत्याही वयोगटासाठी तेवढेच त्रासदायक असले तरी त्याचा सर्वात जास्त त्रास वृद्धांना होतो, असे केईएम रुग्णालयातील डॉ. सुजाता पटवर्धन म्हणाल्या. वृद्धांना आधीच लघवीसंदर्भात तक्रारी असतात, त्यामुळे प्रवासाच्या वेळेस निसर्गाच्या हाकेला प्रतिसाद द्यायला मिळाला नाही तर त्यांचा आजार बळावू शकतो. प्रदीर्घ काळ लघवी तुंबवून ठेवल्यास मूत्रमार्गसंसर्गापासून मूत्रपिंडावर ताण येण्याच्या समस्या स्त्रिया आणि पुरुषांनाही जाणवतात. याशिवाय खड्डय़ात पडल्याने ओटीपोटाला मार लागल्यास शस्त्रक्रियेची वेळ येऊ  शकते, असेही डॉ. पटवर्धन यांनी सांगितले.

सार्वजनिक शौचालयांचा मुद्दा आंदोलनाच्या मार्गाने हिरीरीने मांडला गेल्यावर द्रुतगती मार्गावरील शौचालयांची संख्या गेल्या दोन वर्षांत वाढली. मात्र प्रत्यक्षात त्यातील काही अपवाद वगळता स्त्रियांसाठी ही सोय अप्राप्यच राहिली आहे. घाटकोपरच्या रमाबाई कॉलनी येथील शौचालयात देखरेख ठेवणारा असल्याने स्त्री-पुरुष दोघांना त्याचा वापर करता येतो. इतरत्र मात्र स्त्रियांची कुचंबणा होत आहे. कुर्ला ते ठाणे या मार्गावर अनेक ठिकाणची फिरती शौचालये मोडली आहेत. स्वच्छतेचा मुद्दा आहेच. त्यामुळे या भागात केवळ पुरुषच शौचालयांचा वापर करतात, असे राइट टू पीच्या मुमताज शेख म्हणाल्या.

सर्वात तीव्र समस्या पूर्व द्रुतगती मार्गावर आहे. तिथेच मुंबईत प्रवेश करणारा टोलनाका आहे. टोलनाक्यांना शौचालय बांधणे सक्तीचे केले आहे. असे असूनही ठाणे-मुलुंडमधील या टोलनाक्यावर प्रशस्त शौचालय नाही. जे ओ त्याला वाहतूक चौकीसारखा रंग दिल्याने ते शौचालय आहे, हेही लक्षात येत नाही. तसेच ते स्त्रियांना वापरण्यासारखेही नाही, याकडे अनेक वाहनचालक लक्ष वेधतात. अनेक वाहनचालक भांडुप पम्पिंगच्या आधी उघडय़ावर विधी करतात. तेथे दंडाची तत्पर वसुली केली जाते. मात्र ही तत्परता शौचालय बांधण्याबाबत महापालिका दाखवत नाही, अशी अनेकांची तक्रार आहे.