|| हर्षद कशाळकर

गणेशोत्सव अवघ्या आठ दिवसांवर आला असला तरी यंदाही मुंबईतून कोकणात जाणाऱ्यांचा प्रवास रडत-रखडत होण्याची चिन्हे आहेत. मुंबई-गोवा महामार्गाची मोठय़ा प्रमाणात दुर्दशा झाली आहे. अपूर्ण कामे, ठिकठिकाणी देण्यात आलेले बाह्य़वळण रस्ते यामुळे यंदाही अडथळ्यांची शर्यत पार करत कोकणात जावे लागणार आहे.

मुंबई-गोवा महामार्गाच्या पळस्पे ते इंदापूर या पहिल्या टप्प्यातील चौपदरीकरणाला २०११ मध्ये सुरुवात झाली होती. हे काम २१०४ मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र २०१९ साल उजाडले तरी ते पूर्ण होण्याची चिन्हे नाहीत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या ठिकाणी रस्त्याची कामे झाली आहेत, तिथेही रस्त्याची मोठय़ा प्रमाणात दुर्दशा झाली आहे.

कर्नाळा खिंड, तारा, जीते, पेण, रामवाडी, उचेडे, वडखळ, गडब, पांडापूर, नागोठणे या परिसरांत महामार्गाची परिस्थिती दयनीय आहे. पुलांची कामे अपूर्ण आहेत. अर्धवट तयार झालेल्या पुलांवरून वाहतूक सुरू करण्यात आली आहे. या पुलांवर संरक्षक कठडे अस्तित्वात नाहीत त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. पेण आणि तारा येथे पुलांची कामे सुरू असल्याने वळण रस्ता तयार करण्यात आला. पण या रस्त्यांची सध्या धूळधाण झाली आहे. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे महामार्गावरील वाहतुकीचा वेग मंदावला आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या वारंवार निर्माण होत आहे. अनेक ठिकाणी खड्डे बुजविण्यासाठी महामार्गावर पेव्हर ब्लॉक बसविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामामुळे वाहतूककोंडीत अधिकच भर पडत आहे.

कशेडी घाट अतिवृष्टीने अडीच फूट खचला आहे. या ठिकाणी धिम्या गतीने वाहतुक केली जात आहे. त्यामुळे यंदाही कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचे हाल होणार आहेत.

अर्धवट पूल वाहतुकीसाठी खुले

मुंबई-गोवा महामार्गावर जीते, पेण आणि रामवाडी येथील अपूर्ण अवस्थेत असलेले पूल वाहतुकीसाठी खुले करण्यात आले आहेत. या पुलांवरून दुहेरी वाहतूक सुरू आहे. पुलांवरील रस्ते नादुरुस्त आहेत. शिवाय पुलांना संरक्षक कठडे नाहीत. पेणजवळ एका पुलाची भिंतच कलंडली आहे. त्यामुळे अतिशय धोकादायक परिस्थिती या मार्गावरून अवजड वाहतूक सुरू ठेवण्यात आली आहे. वडखळ येथे होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेऊन महामार्गावर उचेडे ते वडखळ दरम्यान बाह्य़वळण रस्ता देण्यात आला आहे. या रस्त्याची परिस्थिती बिकट आहे.

रायकीय पक्षांचे मौनव्रत

गेली आठ वर्षे मुंबई-गोवा महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम रखडले आहे. रस्त्याची दुरवस्था असल्याने वाहनचालक आणि प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत. मात्र एकही राजकीय पक्ष यावर आवाज उठविण्यास तयार नाही. महामार्गाचे काम करणारे ठेकेदार हे जिल्ह्य़ातील एका बडय़ा राजकीय पक्षाचे नेते आहेत. त्यामुळे शिवसेना-भाजपसकट सर्वच पक्ष रस्त्याच्या दुरवस्थेबाबत मौनव्रत धारण करून बसले आहेत.