|| पंकज भोसले

दहशतवादी हल्ल्यांपेक्षा भारतामध्ये रस्त्यांवरील खड्डय़ांमुळे होणाऱ्या अपघातांचे बळी अधिक असल्याचे वृत्त माध्यमांतून वाऱ्यासारखे पसरत असतानाच, जगात अन्यत्रही खड्डेराक्षसांनी घातलेल्या उच्छादाचे भीषण स्वरूप वृत्तचित्रांतून समोर येत होते. अमेरिकेचे वादग्रस्त अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे ते रशियामधील स्थानिक राजकीय नेत्यांपर्यंत सर्वाना या खड्डय़ांनी ‘ग्रासल्या’चे दिसत आहे. याचे कारण खड्डे हा एक जागतिक रोग आहे. पण म्हणून त्याच्यावर औषध नाही का? ते आहे. नेदरलॅण्ड्स वा जर्मनीसारख्या काही देशांनी ते असल्याचे सिद्ध केले आहे. विदेशातील या समग्र खड्डेपुराणासंबंधीची ही टिपणे..

नेदरलॅण्ड आणि जर्मनी

नेदरलॅण्डमधील रस्ते हे जगातील सर्वात चांगले असल्याचे मानले जाते. २०१० साली येथील प्रशासनाने  पावसाचे पाणी शोषणारे तंत्रज्ञान रस्तेबांधणीत वापरल्या जाणाऱ्या साहित्यात वापरले. त्यानंतर या रस्त्यांना पावसाच्या पाण्यापासून सुरक्षा मिळाली. गेल्या आठ वर्षांत हे तंत्रज्ञान त्यांनी संपूर्ण देशभरात राबवत आपले रस्ते जगातील सर्वोत्तम असल्याचे दावेही अभिमानाने केले. जर्मनीदेखील याचप्रकारे आपल्या रस्त्यांची देखभाल करण्यात आणि त्यांना खड्डेमुक्त करण्यात पटाईत आहेत. त्यामुळे त्यांचेच रस्ते बांधणी आणि देखरेखीचे तंत्र अमेरिकेने आपल्या देशात वापरले. सध्या आपल्याला हेच तंत्र वापरून पुढील काळात मुंबईत चांगले रस्ते पाहायला मिळाले, तर ती खड्डेशहीदांना आदरांजली ठरेल.

अमेरिका

जगावर आर्थिक, सांस्कृतिक आणि मानसिक दादागिरी करणाऱ्या महासत्ता अमेरिकेलाही जर्जर रस्त्यांची बाधा झालेली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या निवडणूक प्रचारातील एक महत्त्वाचा मुद्दा हाच होता. अमेरिकी महामार्गाची आणि स्थानिक रस्त्यांची दुरवस्था बदलण्याचे सूतोवाच त्यांनी एका ‘प्रेसिडेन्शियल डिबेट’मध्ये केले होते. अमेरिकेत रस्त्यांच्या खड्डे दुरुस्तीसाठी वार्षिक ६८ अब्ज डॉलर रिते केले जात असले, तरीही तेथील बहुतांश शहरांतील अंतर्गत मार्ग हे खडबडीत आणि अपघातप्रवण आहेत.

तीन वर्षांपूर्वीच्या एका रस्ता पाहणी अहवालानुसार लॉस एंजेलिस शहर ६० टक्के खड्डय़ांनी वेढले होते. आता त्यात सुधारणा झाली असली, तरी हे शहर खड्डेमुक्त झाल्याचा दावा कुणी करू धजत नाही. तेथील प्रशासनाने पुढील पन्नास वर्षांत अमेरिकेतील सर्व रस्ते गुळगुळीत करण्याचे उद्दिष्ट आखले आहे. तरी दरवर्षी प्रत्येक वाहनचालकाला किमान ३२०० डॉलर इतका वाहनखर्च निव्वळ खड्डय़ांमुळे सोसावा लागत आहे. गेल्या काही दिवसांपासून एका प्रसिद्ध पिझ्झा कंपनीने आपल्या पिझ्झा वितरण यंत्रणेत अडथळा येत असल्याचे सांगत खड्डे बुजविण्याची मोहीम हाती घेतली असून, बुजविलेल्या खड्डय़ांवर आपला शिक्का मारत ही कंपनी जाहिरातीचाही स्वार्थ साधून घेत आहे.

ब्रिटन

ब्रेक्झिटच्या तणावाहूनही अधिक ब्रिटनच्या पंतप्रधानांना मध्यंतरी खड्डय़ांच्या मुद्दय़ाने चिंताग्रस्त केले होते. बारमाही पावसाच्या या राष्ट्रात मार्च ते मे हा कालावधी सर्वाधिक खड्डे तयार होणारा असतो. दरवर्षी त्याबाबत स्थानिक पातळीवरून लोक ओरडा करतात, आंदोलन करतात, सह्य़ांच्या मोहिमा काढतात आणि लोकप्रतिनिधींना सळो की पळो करून सोडतात. यंदा दूरध्वनीवरून नागरिकांनी  केलेल्या तक्रारींची दखल घेत थेरेसा मे यांना ब्रिटनमधील रस्त्यांवर तयार झालेल्या चार हजार खड्डय़ांना बुजविण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची घोषणा करावी लागली. या तक्रारी किती होत्या, तर दिवसाला सरासरी ४४ इतक्या. पण आलेल्या एकूण ४ हजार ९७ तक्रारी आत्तापर्यंतच्या सर्वाधिक लोकरोष व्यक्त करणाऱ्या असल्याने त्यांना तातडीने त्यावर अंमलबजावणी करणे गरजेचे वाटले. आपल्याकडे दिवसाला एका शहरातून हजारो तक्रारी गेल्या तरी स्थितप्रज्ञतेची सीमा गाठणाऱ्या प्रशासनाकडून काहीच उत्तर मिळत नाही, हा फरक चिंतनीय आहे.

कॅनडा

अमेरिकेइतकाच प्रगत आणि बलाढय़ कॅनडातील रस्ते भारतीय खड्डय़ांशी स्पर्धा करण्यासाठी यंदाही सज्ज आहेत. एप्रिल हा या देशात सर्वाधिक खड्डे तयार करणारा महिना मानला जातो. एकटय़ा व्हँकूअर शहरामध्ये ४६ हजार खड्डे असून ‘व्हँकूअर कुरिअर’ या वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार टोरंटो शहरामध्ये एक दोन नाही तर यंदा १२ लाख खड्डे बुजविण्याचे आव्हान प्रशासनासमोर असणार आहे. या खड्डय़ांमुळे अपघातांचे आणि गाडय़ांचे टायर खराब होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. वृत्तमाध्यमांकडून सातत्याने दाखवून दिल्यावर येथील प्रशासन तातडीने खड्डे बुजविण्याच्या कामी लागते. मात्र ‘सालाबादप्रमाणे यंदाही’ प्रशासनावर खड्डय़ांवरून होणाऱ्या उपमांच्या फैरी माध्यमे झाडत राहतात. ‘रस्त्यात खड्डे, की खड्डय़ांत रस्ते’सारख्या धोपट शब्दांचे माध्यमांचे प्रेक्षकही दरवर्षी आनंदाने स्वागत करतात.

बेल्जियम

युरोपातील बहुतांश शहरे ही रस्त्यांबाबत सजग आणि सरळ आहेत. काही ऐतिहासिक शहरांमध्ये तर रस्तेही ऐतिहासिक वास्तूंसारखे जपण्यात आले आहेत. जगातील सर्वात चांगले रस्ते असलेल्या नेदरलॅण्डच्या जवळ असलेल्या बेल्जियममध्ये मात्र रस्त्यांची बऱ्यापैकी दैना आहे. एकटय़ा ब्रसेल्स या नामांकित प्रांतात १९ पालिका आहेत आणि त्यांची सर्वात डोकेदुखी ही रस्त्यांवरील खड्डय़ांना दुरुस्त करण्याची आहे. तेथे काही महिन्यांपूर्वी एका व्यक्तीने रस्त्यांमधील खड्डय़ांमध्ये फुलझाडांची रोपे लावण्याचा उपक्रम राबविला होता. त्यामुळे ही व्यक्ती अल्पावधीत राष्ट्रीय वाहिन्यांवर झळकली होती.

ऑस्ट्रेलिया

न्यू साऊथ वेल्स या ऑस्ट्रेलियामधील प्रांतातील बायरन बे परिसरात गेल्या वर्षी जुलै महिन्यात एका सायकलस्वाराचा मृत्यू झाला. या घटनेने नागरिकांमध्ये इतका उद्रेक झाला की त्यांनी शहराबाहेरच एक झणझणीत संदेश देणारा फलक लावला, की ‘वेलकम टू  बायरन बे, व्हेअर समवन मस्ट डाय टू फिल अ पॉट होल’. या वर्षी ऑस्करला नामांकन असलेल्या एका सिनेमातील गोष्टीप्रमाणे हे शहर या खड्डे अपघातामुळे ढवळून निघाले आणि प्रशासनाने तातडीने खड्डे बुझविण्याची मोहीम हाती घेतली. गेल्या काही वर्षांमध्ये रस्त्यांवर ऑस्ट्रेलियामध्ये खर्च मोठय़ा प्रमाणावर केला जात आहे. लोकउद्रेकानंतर तर तेथील प्रशासन रस्त्यांची जपणूक बऱ्यापैकी करीत आहे.

रशिया

रशियामध्ये नागरिकांनी आपल्या खड्डय़ांवरील उद्रेक दर्शनीय कलेमध्ये रूपांतरित केला. गेल्या दोन-तीन वर्षांमध्ये या देशातील ठिकठिकाणच्या प्रांतात खड्डय़ांसाठी स्थानिक लोकप्रतिनिधींना जबाबदार धरून त्या खड्डय़ांभोवती नेत्यांचे चेहरे रंगवण्याची कामगिरी केली. या चेहऱ्यांच्या उघडय़ा तोंडाच्या मध्यभागी खड्डे दिसतील याची काळजी घेतली. नेत्यांच्या प्रतिमा खड्डय़ागणिक दिसू लागल्यामुळे प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी तातडीने खड्डेभरू मोहीम राबविली.

मलेशिया, थायलंड, दक्षिण कोरिया

थायलंडमधील बहुतांश पर्यटन शहरांमध्ये भुयारी गटारांची यंत्रणा सुरळीत आहे. दोन-तीन वर्षांपूर्वी येथील एका खेडय़ामधील रस्त्यांवर असलेल्या खड्डय़ांच्या निषेधार्थ एका तरुणीने त्यात आंघोळ करण्याचा निर्णय घेतला आणि ती सार्वजनिक आंघोळ खड्डय़ासह समाजमाध्यमांवर चर्चेचा विषय बनली. सध्या बहुतांश शहरे आणि शहरगावे खड्डेमुक्त आहेत. दक्षिण कोरियामधील रस्त्यांची स्थिती आपल्या देशाहून उत्तम आहे. मलेशिया या गेल्या दोन दशकांत विकसित झालेल्या राष्ट्राने खड्डे बुजविण्याची मोहीम गेल्या काही वर्षांत अत्यंत गंभीरपणे राबविली. सध्या त्यांचे लक्ष्य २०२०पर्यंत संपर्ण देश खड्डेमुक्त करण्याचा असून प्रशासनाने एक अ‍ॅप तयार केले आहे. या अ‍ॅपवर तक्रार केल्यास तातडीने त्या त्या भागातील खड्डे बुजविण्यास पालिकेची यंत्रणा कामाला लागते.

नायजेरिया

भारतासारखीच भूरचना असलेल्या नायजेरियामध्ये गेल्या काही महिन्यांमध्ये समाजमाध्यमांमध्ये सर्वाधिक व्हायरल झालेली गोष्ट कोणती असेल, तर ती देशाचा नकाशा आकार असलेल्या  खड्डय़ाची. भीषण आकाराच्या या खड्डय़ाने वृत्तमाध्यमांना बरेच दिवस खाद्य पुरविले होते. काही दिवसांपूर्वी बोको हराम या दहशतवादी संघटनेने सहा व्यापाऱ्यांना या देशाच्या सीमेजवळ ठार करून त्यांच्या साऱ्या मालाने भरलेल्या ट्रक्सची लूट केली. या घटनेला वृत्तमाध्यमांनी दहशतवाद्यांइतकेच तेथील रस्त्यांवर असलेल्या खड्डय़ांनाही जबाबदार धरले. या खड्डय़ांमुळे व्यापाऱ्यांना आपल्या गाडय़ा जोरात पळवता आल्या नाहीत आणि त्यामुळे ते दहशतवाद्यांच्या तावडीत सापडले.