सामाजिक समता आणि पुरोगामीत्वाचा झेंडा खांद्यावर घेऊन राष्ट्रसंत गाडगे बाबा स्वच्छता अभियान, निर्मल ग्राम योजना, परिसर स्वच्छता अशा असंख्य योजनांचा डांगोरा पिटणाऱ्या महाराष्ट्रात अद्यापही मानवी विष्ठा हाताने वाहून नेणारी कुटुंबे अस्तित्वात असल्याची लाजीरवाणी बाब उघड झाल्याने, राज्य सरकार आणि राजधानी मुंबईसह सुमारे अडीचशे शहरांच्या स्थानिक स्वराज्य संस्थांची झोप उडाली आहे.
सामाजिक न्यायाला काळीमा फासणारी आणि माणसाला हीन ठरविणारी ही कुप्रथा नष्ट व्हावी व त्यात अडकलेल्यांना मुक्त करून त्यांचे पुनर्वसन व्हावे यासाठी केंद्र सरकारच्या पातळीवर गेली दोन दशके सुरू असलेल्या विविध उपायांचेही यामुळे िधडवडे निघाले असून असे काम करणाऱ्या कुटुंबांची तातडीची शोधमोहीमच नव्याने हाती घेण्यात आली आहे. अनारोग्यकारी शौचकूपांमधील मानवी विष्ठा हाताने साफ करणाऱ्या, तो वाहून नेणाऱ्या किंवा अन्य कोणत्याही प्रकारे हाताळणाऱ्या व्यक्तीस हाताने काम करणारा मेहेतर म्हटले जाते. सन २०११ च्या जनगणनेत मुंबईसह राज्याच्या अनेक शहरांमध्ये अशा व्यक्ती असल्याचे आढळल्याने या प्रथेचे निर्मूलन करण्याच्या दोन दशकांहून अधिक काळ सुरू असलेल्या मोहिमांना हादरा बसला आहे. मुंबई महापालिकेच्या क्षेत्रात एक हजार १३७ शौचालयांची सफाई माणसांकरवी हाताने केली जात असल्याचे जनगणना सर्वेक्षणातून स्पष्ट झाल्यानंतर केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांचीही धावपळ सुरू झाली. वरिष्ठ केंद्रीय अधिकाऱ्यांच्या महापालिका अधिकाऱ्यांसमवेत बैठका झाल्या आणि मुंबईतील अशा व्यक्तींचा शोध घेण्याचे आदेशही जारी झाले.
मानवी विष्ठा वाहून नेण्याची प्रथा हद्दपार झाल्याचा दावा या सर्वेक्षणामुळे फोल ठरल्याचे दिसत असून राज्यातील अन्य काही महापालिका, नगर परिषदांमध्येही या हीन कामाला माणसे जुंपण्याची प्रथा कमीअधिक प्रमाणात जिवंत असल्याचे दिसत आहे. मुंबई हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर बनविण्याच्या स्वप्न केंद्र आणि राज्य सरकारने मुंबईकरांच्या मनात पुरते रुजविले आहे. आधुनिकतेची प्रत्येक वाट जिथे येऊन थांबते, त्याच मुंबईत अशी प्रथा अजूनही सुरू असावी आणि स्थानिक प्रशासन किंवा राज्य सरकारला त्याबाबत गंधवार्ताही नसावी ही बाब अधिकच धक्कादायक आहे.     (पूर्वार्ध)