मुंबई : शेतकऱ्यांना केवळ कर्ज देऊन प्रश्न सुटत नाही. कारण सरकार एका बाजूने अनुदान देते तसे ते दुसरीकडे काढूनही घेते. त्यापेक्षा शेतीशी संबंधित सर्व माहितीचे पारदर्शक संकलन करून, निर्यातीला पोषक बाजारपेठा शोधून, बाजारातील मागणी-पुरवठय़ाच्या चढउतारांबाबत योग्य ती माहिती पुरवून शेती आणि शेतकऱ्यावरील टांगती तलवार दूर करता येऊ शकते, असा सूर ‘कृषी उद्योगाचे अर्थशास्त्र’ या विषयावरील सत्रात उमटला.

खासदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, वस्तू बाजार विश्लेषक उदय तारदाळकर आणि कृषी अर्थशास्त्राचे अभ्यासक राजेंद्र जाधव यांनी या भारतातील शेतीचे दुखणे नेमकेपणाने मांडले.

भारतात अन्नधान्यांच्या किमती नियंत्रित करण्याच्या नावाखाली शेतीमालाचे भाव पाडण्याचे धोरण सरकार अवलंबते. त्यामुळे अर्थव्यवस्था खुला असो वा बंदिस्त, शेतकऱ्याचे मरणे हे ठरलेले आहे, अशा परखड शब्दांत राजू शेट्टी यांनी सरकारच्या धोरणांचा समाचार घेतला. आपल्या राज्यात जितके लाड साखर उद्योगाचे झाले तितके ते इतर शेती उत्पादनांचे झाले असते तर परिस्थिती वेगळी असती. आज शेतकऱ्याला साखर हे एकच उत्पादन शाश्वत आणि पैसे मिळवून देणारे वाटत असेल तर त्याला सरकारची धोरणे जबाबदार आहेत. त्याऐवजी ऊस उत्पादकालाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले जाते, असे राजू शेट्टी यांनी सांगितले.

शेट्टी यांच्या सुरात सूर मिसळत तारदाळकर यांनी शेतीच्या बाजारपेठेचे गणित नेमके कसे चुकते याकडे लक्ष वेधले. शेतमालाच्या बाजारपेठेबाबत पारदर्शकता आणि तरलता या दोन मुख्य तत्त्वांचे कधीच पालन होत नाही. आता शेतकऱ्याला दिली गेलेली सहा हजार रुपयांची मदतही तुटपुंजी आहे. शेतीचे दुखणे संपवायचे असेल तर निती आयोगाप्रमाणे शेती आयोगाची निर्मिती केली पाहिजे, अशी सूचना त्यांनी केली. माहितीची योग्य व पारदर्शक अनुपलब्धताही शेतीच्या मुळावर कशी होते, हे जाधव यांनी नेमकेपणाने मांडले. आपल्याकडे साखर वगळता कुठल्याही कृषी उत्पन्नाचा अंदाज बांधता येत नाही. यामुळे निर्यातीत भारत चमकदार कामगिरी करू शकलेला नाही. भारतापेक्षा लहान असलेला व्हिएतनाम यात कैकपटीने पुढे आहे. याउलट आपल्याकडे कृषी विकास दराचे खोटे आकडे दिले जातात. त्यामुळे कृषीचे अर्थशास्त्रच कोलमडते आणि शेतकरी आणखी पिचतो, अशा शब्दांत त्यांनी शेतकऱ्यांच्या दुखण्याला हात घातला. भारतातील शेती क्षेत्राचे अर्थशास्त्र सुधारायचे असेल तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील नवनवीन संधी शोधणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ‘लोकसत्ता’चे सिद्धार्थ खांडेकर यांनी या परिसंवादाचे सूत्रसंचालन केले.