24 September 2020

News Flash

‘नव्या तंत्राने शेती करणे आवश्यक’

प्रमोद रसाळ यांनी विद्यापीठ स्तरावर शेती उत्पादन प्रक्रियेविषयी सुरू असलेल्या संशोधनाची माहिती दिली.

कृषी संशोधनाची सद्यस्थिती उलगडून सांगताना डॉ. प्रमोद रसाळ. सोबत आयसीटीचे कुलगुरू गणपती यादव.

मुंबई : जगाची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असून त्यासाठी लागणारे पुरेसे अन्नधान्य निर्माण करण्यासाठी पारंपरिक पद्धत सोडून शेती उत्पादनात नव्या तंत्रज्ञानाचा स्वीकार करावा लागेल. जमिनीचा पोत, पाण्याची उपलब्धता, बदलते हवामान विचारात घेऊन त्याला पूरक ठरणाऱ्या वाणांचा वापर करून शेती उत्पादनात गुणात्मक आणि संख्यात्मक वाढ करता येऊ शकेल, असा विश्वास ‘कृषी संशोधनाची सद्यस्थिती’ या विषयावरील परिसंवादात तज्ज्ञांनी व्यक्त केला.

इन्स्टिटय़ूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीचे कुलगुरू गणपती यादव आणि पुणे येथील कृषी विद्यापीठाचे सहयोगी अधिष्ठाता प्रमोद रसाळ यांनी या चर्चासत्रात शेती विषयात सुरू असलेले नवे संशोधन आणि त्याचे फायदे याविषयी विस्तृत विवेचन केले.

जैविक तंत्रज्ञान शाखेतील संशोधन शेती उद्योगाला अतिशय उपकारक ठरेल. विशेषत: जनुकीय बदल (जेनेटिकली मॉडिफाईड) केलेल्या नव्या पिकांचा वापर अपरिहार्य आहे. मात्र आपल्याकडे दुर्दैवाने या बाबतीत गैरसमजच अधिक आहेत. हजार वर्षांपूर्वी गाजर अस्तित्वात नव्हते. तीनशे वर्षांपूर्वी ते नेदरलॅण्डमध्ये विकसित झाले. वनस्पतीजन्य पदार्थापासून अनेक जैविक रसायने तयार करता येतात. जैविक तंत्रज्ञानाने भाताच्या पाल्यापासून साखर बनविणे शक्य आहे. शेतकऱ्यांनी अशा प्रकारच्या नव्या संशोधनाची माहिती करून घेतल्यास त्यांना अधिक उत्पन्न मिळू शकते. शासनानेही शेतकऱ्यांना केवळ अनुदान न देता या नव्या तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यास प्रोत्साहन द्यावे, असे मत गणपती यादव यांनी मांडले.

प्रमोद रसाळ यांनी विद्यापीठ स्तरावर शेती उत्पादन प्रक्रियेविषयी सुरू असलेल्या संशोधनाची माहिती दिली. भात, ज्वारी, बाजरी, गहू, मका, भुईमूग, सूर्यफूल आदी पिकांचे निरनिराळे वाण विकसित केले जात आहेत. पूर्वी आपण परदेशातून नित्कृष्ट प्रतीचा गहू आयात करीत होतो. आता भारत सर्वाधिक गहू पिकविणारा दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. खास लोणच्यासाठी आंब्याची विशेष जात विकसित करण्यात आली आहे. पिकांना कोणतीही हानी न पोहोचविणारी जैविक कीटकनाशके आता वापरली जातात. शेती उद्योगात भेडसावणारी मजुरांची समस्या लक्षात घेऊन फुले आणि कैऱ्या तोडण्यासाठी नावीन्यपूर्ण अवजारे तयार करण्यात आली आहेत. आतापर्यंत विद्यापीठात निरनिराळ्या पिकांचे २५५ वाण विकसित करण्यात आले आहेत. तीन पेटंट विद्यापीठाच्या नावावर आहेत. पुणे कृषी विद्यापीठात दरवर्षी १६ ते १७ हजार क्विंटल बियाणे तयार करून ते शेतकऱ्यांमध्ये वितरित केले जाते, असेही रसाळ यांनी सांगितले. या सत्राचे सूत्रसंचालन ‘लोकसत्ता’च्या रसिका मुळ्ये यांनी केले.

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 22, 2019 3:26 am

Web Title: badalta maharastra event dr pramod rasal ict vice chancellor ganpati yadav
Next Stories
1 निर्यातीला पोषक बाजारपेठ शोधण्याची गरज
2 शेतकऱ्यांना ‘जीएसटी’चा परतावा मिळायला हवा : शेट्टी
3 ‘ट्रॉमा केअर’मध्ये ढिलाई!
Just Now!
X