जीएसटी, मन की बातचाही ट्रेण्ड

ताज्या घडामोडींचे हक्काचे व्यासपीठ असलेल्या ट्विटरवर २०१७ मध्ये बाहुबली २ हा हॅशटॅग सर्वाधिक चर्चेत राहिला. तर याचबरोबर जीएसटी, मन की बात या हॅशटॅगवरही  चर्चा रंगल्या.

वर्षभरात भारतीयांनी केलेल्या ट्वीटमध्ये कोणत्या विषयांवर सर्वाधिक चर्चा रंगली याबाबत ट्विटरने एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालात मनोरंजन विभागात बाहुबली २ सर्वाधिक चर्चा झालेला विषय असल्याचे समोर आले आहे. तर वृत्त आणि राजकारण या विभागात जीएसटी आणि मन की बात हे दोन हॅशटॅग ट्रेण्डिंग होते. मनोरंजन क्षेत्रात या वर्षी दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीने बाजी मारली आहे. दक्षिण भारतातील सूर्या शिवकुमारच्या चित्रपटाच्या पोस्टरचे छायाचित्र असलेले ट्वीट ‘गोल्डन ट्वीट’ म्हणून घोषित करण्यात आले आहे. हे २०१७ मध्ये हे ट्वीट सर्वाधिक रीट्वीट करण्यात आले. क्रीडा विभागात भारत पाकिस्तान सामन्यावर सर्वाधिक दहा लाख ८० हजार ट्वीट झाले. तर सर्वाधिक अनुयायी असलेल्या ट्विटरतींच्या यादीत प्रथमच विराट कोहली आणि सचिन तेंडुलकर यांचा पहिल्या दहामध्ये समावेश झाला आहे.

देशातील सामाजिक घडामोडींवरही या व्यासपीठावर चर्चा रंगली. यामध्ये तिहेरी तलाक या विषयावर सर्वाधिक ट्वीट करण्यात आले. याशिवाय जलिकट्टच्या निवाडय़ानंतरही जलिकट्टचा हॅशटॅग ट्रेण्डिंग होता.

अक्षय कुमारची मुसंडी

सर्वाधिक अनुयायी असलेल्या ट्विटरतींच्या यादीत नरेंद्र मोदी यांनी आपले पहिले स्थान कायम ठेवले आहे. त्यांच्या अनुयायांमध्ये २०१६च्या तुलनेत ५२ टक्के वाढ होऊन ही संख्या तीन कोटी ७५ लाखपर्यंत पोहोचली आहे. तर अक्षयकुमारच्या अनुयायांमध्येही ५२ टक्के वाढ झाली असून त्याने आमीर खान आणि दीपिका पदुकोन यांना मागे टाकत पाचव्या क्रमांकावर मुसंडी घेतली आहे.

अव्वल दहा ट्विटरतींची यादी

  • नरेंद्र मोदी – तीन कोटी ७५ लाख
  • अमिताभ बच्चन – तीन कोटी १५ लाख
  • शाहरुख खान – तीन कोटी नऊ लाख
  • सलमान खान – दोन कोटी ८५ लाख
  • अक्षयकुमार – दोन कोटी २८ लाख
  • आमीर खान – दोन कोटी २४ लाख
  • दीपिका पदुकोन – दोन कोटी १० लाख
  • सचिन तेंडुलकर – दोन कोटी १७ लाख
  • हृतिक रोशन – दोन कोटी नऊ लाख
  • विराट कोहली – दोन कोटी आठ लाख