मुखपट्टी न लावल्याने दंडाची मागणी करणाऱ्या पालिका अधिकाऱ्यांशी वाद घातल्याच्या आरोपाप्रकरणी अटकेत असलेल्या २० वर्षीय भाजीविक्रेत्याची सत्र न्यायालयाने जामिनावर सुटका केली.

करोनाच्या पार्श्वभूमीवर लागू केलेल्या टाळेबंदीमुळे तळागाळातील लोकांना मोठय़ा प्रमाणात त्रास सहन करावा लागला असून, त्यातून उद्भवलेल्या परिस्थितीमुळेच ही घटना घडली असावी, असे न्यायालयाने त्याची जामिनावर सुटका करताना प्रामुख्याने नमूद केले.

मुखपट्टीचा वापर आणि अंतर नियमांच्या पालनाबाबत कठोर अंमलबजावणीसाठी ३१ ऑक्टोबर रोजी पालिकेकडून विशेष मोहीम राबवण्यात आली होती. त्या वेळी शिवाजी पार्क येथे जगदिशा कोरे हा युवक मुखपट्टी न लावताच भाजीविक्री करत असल्याचे त्यांना निदर्शनास आले.

पालिकेच्या कारवाई पथकाने त्याच्याकडे २०० रुपयांच्या दंडाची मागणी केली. त्यावेळी कोरे आणि अन्य दोघा विक्रेत्यांनी त्यांच्याशी वाद घातला आणि त्यांना धमकावले. त्यानंतर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी १०० क्रमांकावर संपर्क साधून पोलिसांना बोलावले. त्यानंतर पोलिसांनी जगदिशासह आणखी एकाला अटक केली.

झाले काय?

आपण दंडाची रक्कम भरण्यासाठी तयार होतो, मात्र अन्य दोघांचा पालिकेच्या अधिकाऱ्यांशी वाद झाल्याने त्यालाही अटक करण्यात आली, असा दावा कोरे याने जामिनासाठी अर्ज करताना केला. न्यायालयानेही त्याचे म्हणणे मान्य केले. करोनाच्या पार्श्वभूमीवर लागू केलेल्या टाळेबंदीचा तळागाळातील लोकांना सर्वाधिक फटका बसला असून त्यामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे ही घटना घडली असावी. शिवाय कोरे याला कोणती गुन्हेगारी पार्श्वभूमीही नाही, असे नमूद करत न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला.