परळच्या बैलघोडा रुग्णालयात आजारी ‘पग’च्या संख्येत वाढ

ठरावीक प्रजातीच्या श्वानासाठीचा मानवी अट्टहास या प्राण्यासाठी घातक ठरू लागल्याचे दिसून येत आहे. ‘व्होडाफोन’च्या जाहिरातीमुळे लोकप्रिय झालेल्या ‘पग’ या जातीच्या श्वानासाठी ‘इनब्रिडिंग’ अर्थात आंतरप्रजनन (एकाच मातेच्या पोटी जन्मलेल्या नर-मादीच्या संयोगातून होणारे जनन) करण्याचा प्रकार अलीकडे वाढत चालला आहे. मात्र, अशा जनन प्रक्रियेतून जन्मणारे श्वान सतत आजारी पडत असल्याचे दिसून आले आहे. परळमधील बैलघोडा रुग्णालयात आंतरप्रजननातून जन्मणारे १२ ते १५ श्वान दरमहा उपचार घेण्यासाठी दाखल होत असल्याची बाब समोर आली आहे.

‘व्होडाफोन’च्या जाहिरातीमुळे ‘पग’ या जातीच्या श्वानाला कमी काळातच खूप प्रसिद्धी मिळाली. यात या पगची मागणी वाढल्याने अनेक श्वान व्यावसायिकांनी पगची ‘इनब्रीडिंग’ करावयास सुरुवात केली. यामुळे श्वानप्रेमींपर्यंत त्यांच्या आवडीच्या पगचा पुरवठा झाला असला तरी इनब्रीडिंगमुळे त्याच्या आरोग्याच्या तक्रारीही सुरू झाल्या. परळ येथील बैलघोडा रुग्णालयात दरमहिन्याला १२ ते १५ श्वानांवर इनब्रीडिंगमुळे सुरू झालेल्या आरोग्याच्या समस्यांवर उपचार केले जातात. तर माहीम येथील एका पशुवैद्यकतज्ज्ञाने दिलेल्या माहितीनुसार सध्या मुंबईत इनब्रीडिंगचे प्रमाण एकूण प्रजनन संख्येच्या १० टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. सध्या मुंबईत ‘पग’ आणि ‘जर्मन शेफर्ड’ या श्वानांच्या इनब्रीडिंगची प्रकरणे सर्वाधिक पाहिली जातात. व्यवसाय करण्यासाठी आणि अज्ञानामुळेही व्यवसायिकांकडून ‘इनब्रीडिंग’ केले जाते. श्वान जन्माला आल्यानंतर त्यांच्यामधील आजारपण तातडीने दिसून येत नाही. मात्र ४ ते ६ महिन्यांनंतर श्वानांना सांधेदुखी सुरू होते. त्यांचे मागचे पाय बाहेरच्या बाजूला कलल्यामुळे चालताना अडथळा निर्माण होतो, असे पशुवैद्यकतज्ज्ञ डॉ. दिनेश विन्हेरकर यांनी सांगितले.

खार पश्चिम येथील कॅनल क्लब ऑफ इंडिया येथे श्वानांची नोंदणी केली जाते. नोंद केलेल्या श्वानाचे आई-वडील, आजी-आजोबा अशी सर्व माहिती या संस्थेकडे असते. मात्र, श्वान नोंदणी करण्याबाबतचे नियम कडक नसल्यामुळे या संस्थेत वर्षांला केवळ ४०० ते ५०० श्वानांची नोंद केली जाते, असे या संस्थेच्या सचिव शैला नहरवार यांनी सांगितले.

आंतरप्रजननाचा धोका

* इनब्रीडिंगचा परिणाम प्राण्यांची उंची, वजन, आकारमानावरही होत असतो. याशिवाय हृदयविकार, वंध्यत्व आदी समस्याही उद्भवण्याची शक्यता असते.

* अशा प्राण्यांची रोगप्रतिकारक शक्ती जन्मत: कमी असते. त्यामुळे साधारण संसर्गामुळेही त्यांना लगेच आजार जडतो, असे बैलघोडा रुग्णालयाचे सचिव कर्नल डॉ. जे.सी.खन्ना यांनी सांगितले.

* इनब्रीडिंग, क्रॉसब्रीडिंग, मिक्सब्रीडिंग हे श्वानांसाठीच काय, पण कुठल्याही प्राण्यांसाठी घातक आहे. यामुळे त्यांना आयुष्यभराचे आजारपण सुरू होते. परदेशी श्वानांना घरात ठेवण्याऐवजी रस्त्यावरील भटक्या श्वानांना दत्तक घेतले तर या रस्त्यावरील प्राण्यांना घर मिळेल आणि हे श्वानही चांगले साथीदार म्हणून सोबत राहतात, अशी भावना ‘पॉझ’ संस्थेचे संस्थापक नीलेश भणगे यांनी व्यक्त केली.