भाजपचे सोलापूर येथील खासदार डॉ. जयसिद्धेश्वर स्वामी यांना राखीव जागेवर लोकसभा निवडणूक लढवता यावी यासाठी जातीचे बनावट जात प्रमाणपत्र मिळवून देण्याच्या आरोपप्रकरणी अटकेत असलेल्या शिवसिद्ध विठ्ठल बुल्ला याला उच्च न्यायालयाने सोमवारी जामीन मंजूर केला.

गेल्या अडीच महिन्यांपासून तो अटकेत असून त्याच्या आणखी कोठडीची आवश्यकता नाही, असे न्यायमूर्ती साधना जाधव यांनी त्याची ५० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर सुटका करताना नमूद केले. आरोपनिश्चिती होईपर्यंत सोलापूरमधील सदर बाजार पोलीस ठाण्यात दर सोमवारी हजेरी लावावी आणि पोलिसांच्या तपासात कोणत्याही प्रकारे हस्तक्षेप करू नये, अशी अटही न्यायालयाने जामीन मंजूर करताना घातली.

त्याच्या घरावरील छाप्यात अनेक प्रमाणपत्रे, कागदपत्रे व दंडाधिकाऱ्यांचे सील आढळले. त्यामुळे बुल्ला हा बनावट प्रमाणपत्रे बनवून देण्याचे काम करतो आणि जयसिद्धेश्वर स्वामींना बनावट जात प्रमाणपत्र मिळवून दिल्याचा पोलिसांचा आरोप आहे.