‘रिपब्लिक टीव्ही’चे संपादक अर्णब गोस्वामी यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. रायगड पोलिसांनी अर्णब गोस्वामी यांना मुंबई येथील घरातून ताब्यात घेतलं आहे. वास्तुविशारद अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी अर्णब यांना अटक केल्यानंतर यावरुन आता विरोधी पक्ष असणाऱ्या भाजापाने राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. याच अटकेच्या पार्श्वभूमीवर मुंबई भाजपाने ट्विटरवरुन महाराष्ट्र सरकारवर टीका करताना राज्यात आणीबाणी असल्याचे म्हटले आहे. मात्र या अटकेचा संदर्भ मुंबई भाजपाने पालघर प्रकरणातील चार जणांना जामीन मिळाल्याशीही जोडला आहे.

नक्की वाचा >> अर्णब गोस्वामी अटक : अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण नेमकं आहे तरी काय, जाणून घ्या

पालघरमधील गडचिंचले साधू हत्याकांड प्रकरणीतील चार आरोपींना विशेष न्यायालयाने जामीन मंजूर केला. याच दोन घटनांच्या पार्श्वभूमीवर मुंबई भाजपाने ट्विटरवरुन महाराष्ट्र सरकारवर टीका केली आहे. “महाराष्ट्रामध्ये पालघरीमधील साधू हत्याकांड प्रकरणामधील आरोपींना जामीन मंजूर करण्यात आला तर २०१८ साली तपास बंद करण्यात आलेल्या प्रकरणामध्ये अर्णब गोस्वामी यांना अटक करण्यात आली. हा पुन्हा आणीबाणी लागू करण्याचा प्रयत्न आहे,” असं ट्विट मुंबई भाजपाने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन केलं आहे.

एकीकडे भाजपाने या विषयावरुन महाराष्ट्र सरकारवर टीकास्त्र सोडलेलं असतानाच दुसरीकडे काँग्रेसने मात्र या प्रकरणामध्ये अर्णब यांची अटक कायदेशीर असल्याचे म्हटले आहे. काँग्रेसने या प्रकरणाचा पत्रकारितेच्या स्वातंत्र्याशी काहीही संबंध नसल्याचे म्हटले आहे. हे प्रकरण गुन्हेगारीशी संबंधित आहे, असंही काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी म्हटलं आहे. रायगड-अलिबाग पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने अलिबागच्या मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांना दिलेल्या उत्तराचे पत्रही सावंत यांनी ट्विट केलं आहे.

मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांना पोलिसांनी पाठवलेल्या पत्राचा फोटो सावंत यांनी ट्विट करत, “यावरुन अर्णब गोस्वामींविरोधात करण्यात आलेली कारवाई ही पूर्णपणे कायदेशीर आहे हे स्पष्ट होत आहे,” असं म्हटलं आहे. तसेच “या प्रकरणाचा पत्रकारितेशी काहीही संबंध नाही. आत्महत्येच्या चिठ्ठीमध्ये नाव असल्याने या प्रकरणाची निष्पक्षपणे चौकशी व्हायला हवी मात्र फडणवीस सरकारने ती होऊ दिली नाही,” असं म्हटलं आहे.

सावंत यांनी ट्विट केलेलं पत्र १५ ऑक्टोबर रोजी पाठवण्यात आल्याचे त्यावरील तारखेवरुन स्पष्ट होत आहे. या पत्रामध्ये पोलीस संबंधित प्रकरणाचा तपास करत असल्याची माहिती रागयड-अलिबागमधील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरिक्षक जे. ए. शेख यांनी अलिबागच्या मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांना दिली आहे.

काँग्रेस म्हणते #JusticeForAnvayNaik

या ट्विटच्या आधी सावंत यांनी यांच प्रकरणावर अन्य एका ट्विटमधूनही भाष्य केलं आहे. अर्णब यांना अटक झाल्यानंतर धन्यवाद महाविकास आघाडी सरकार असं म्हणत सावंत यांनी महाराष्ट्र सरकारचे आभार मानले. त्याचबरोबरच त्यांनी #JusticeForAnvayNaik हा हॅशटॅगही वापरला आहे. “अन्वय नाईकला न्याय मिळवून दिल्याबद्दल महाविकास आघाडी सरकारला धन्यवाद,” असं सावंत यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

सावंत यांच्याबरोबरच अनेक काँग्रेस समर्थकांनी #JusticeForAnvayNaik हा हॅशटॅग वापरुन ट्विट केलं आहे. अनेकांनी या प्रकरणामध्ये मागील काही दिवसांत पोलिसांनी केलेल्या तपासाच्या बातम्यांचे फोटोही ट्विट केले आहेत.