मद्यधुंद अवस्थेत पूर्व द्रुतगती महामार्गावर बेदरकारपणे कार चालवून दोघांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा आरोप असलेली कॉर्पोरेट वकील जान्हवी गडकर हिची बुधवारी जामिनावर सुटका झाली. सत्र न्यायालयाने तिला ३० हजार रुपयांचा जामीन मंजूर केला.

दीड महिन्यापासून कारागृहात असलेल्या जान्हवीचा महानगर दंडाधिकाऱ्यांनी दोन वेळा जामीन फेटाळल्यानंतर तिने सत्र न्यायालयात धाव घेतली होती. तपासात सहकार्य करणे, जेव्हा केव्हा चौकशीसाठी बोलावले जाईल तेव्हा हजर होणे आणि परवानगीशिवाय परदेशी न जाणे अशा अटींवर न्यायालयाने जान्हवीला जामीन मंजूर केला.

एका प्रवाशाच्या मृत्यूप्रकरणी जान्हवीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी जान्हवीने दोन वेळा जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र कुर्ला महानगर दंडाधिकाऱ्यांनी तो फेटाळून लावला होता. तपास सुरू असताना तिला जामीन देण्यात आल्यास ती पुरावे नष्ट करण्याची शक्यता व्यक्त करून सरकारी वकिलांनी तिच्या जामिनाला विरोध केला होता. महानगर दंडाधिकाऱ्यांनी त्यांचे म्हणणे मान्य करून तिचा अर्ज फेटाळला होता. त्यामुळे तिने सत्र न्यायालयात जामिनासाठी धाव घेतली होती. तपास पूर्ण झाला असून कारागृहात ठेवण्याची गरज नाही, हा जान्हवीने केलेला युक्तिवाद न्यायालयाने मान्य करत तिला जामीन मंजूर केला.