मुंबई
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनाच्या दिवशी मुंबईतील ‘बंद’बाबत शाहीन धाडा या तरुणीने फेसबूकवर दिलेल्या प्रतिक्रियेनंतर तिच्या काकांच्या पालघर येथील धाडा रुग्णालयावर हल्ला करुन तोडफोड करणाऱ्या दहाजणांना पालघर पोलिसांनी सोमवारी मध्यरात्री अटक केली. या सर्वाची न्यायालयाने जामिनावर मुक्तता केली आहे. तोडफोडीत प्रत्यक्षात सहभाग नसतानाही यापैकी काहीजणांना पोलिसांनी अटक केल्याची चर्चाही ऐकायला मिळत होती.
या घटनेचे पडसाद थेट दिल्लीपर्यत उमटल्यानंतर पालघर पोलिसांनी येऊर गावातील विजयनगर येथील दहा हल्लेखोरांना अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांची जामिनावर मुक्तता करण्यात आली. अटक केलेले हल्लेखोर डमी असल्याची जोरदार चर्चा आहे. मात्र पोलिसांनी त्याचा इन्कार केला आहे. दरम्यान कोकण परिक्षेत्राचे महानिरीक्षक सुखविंदर सिंग यांनी पालघरला भेट देऊन घटनेचा आढावा घेतला. पोलिसांची कारवाई योग्य की अयोग्य त्यावर आताच भाष्य करणे योग्य नसल्याचे त्यांनी सांगितले.
शाहीनच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार करणारे शिवसेना शहरप्रमुख भूषण संख्ये यांनी सांगितले की, आम्ही संयम पाळत, शाहीनने माफी मागावी, अशी मागणी केली होती.
या रुग्णालयासमोर शाहिनच्या वडिलांचे औषधांचे दुकान आहे. त्याऐवजी तिच्या काकांच्या रुग्णालयात तोडफोड करण्यामागे ‘फेसबूक’च्या वादाचे केवळ निमित्त असावे, अशी चर्चा ऐकायला मिळत होती.    
शिवसेनेकडून हल्ल्याचे समर्थन
शाहीन धाडा हिच्या काकांच्या रुग्णालयाच्या तोडफोडीचे जोरदार समर्थन शिवसेना ठाणे (ग्रामीण) जिल्हाप्रमुख प्रभाकर राऊळ यांनी केले आहे. ‘या तोडफोडीचे आम्ही समर्थन करतो. शिवसैनिकांची ती उत्स्फूर्त भावना होती,’ असे त्यांनी सांगितले. उलट पोलिसांनी आमचे आभार मानायला हवे असे सांगून ती तरुणी मुस्लिम असूनही आम्ही या प्रकरणाला जातीय रंग येऊ दिला नाही, असा दावाही त्यानी केला.
एका विक्षिप्त तरुणीमुळे आम्ही संपूर्ण समाजाला वेठीस धरू शकलो असतो. पण आम्ही हे प्रकरण चिघळू दिले नाही. परंतु या तरुणीने सुरुवातीला माफी मागण्यास नकार दिल्यामुळेच हे प्रकरण चिघळले, असा दावाही त्यांनी केला. आम्ही पोलिसांकडे गेलो नसतो तर राज्यातल्या अनेक मोठय़ा नेत्यांविरोधात आक्षेपार्ह विधान करण्याची प्रवृत्ती वाढीस लागली असती, असेही ते म्हणाले.