मुंबईतल्या बोरीवली भागात असलेल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात बाजीराव नावाचा पांढरा वाघ वास्तव्य करत होता. त्याचा वयोमानामुळे मृत्यू झाला आहे. २००१ मध्ये रेणुका आणि सिद्धार्थ या वाघांच्या जोडीने एका बछड्याला जन्म दिला. या वाघाचे नाव बाजीराव असे ठेवण्यात आले होते. आज म्हणजेच ३ मे रोजी त्याचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट करण्यात आले. संधीवात आणि स्नायुदुखीमुळे गेल्या ४ वर्षांपासून त्याला ग्रासले होते. गेल्या १० ते ११ दिवसांपासून त्याला चालतानाही त्रास होत होता. उपचारादरम्यान या वाघाचा मृत्यू झाला.
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या निवृत्त पशुवैद्यक तज्ज्ञांनी या वाघाची पहाणी करून आणि त्याच्या वाढत्या वयाचा विचार करून काही उपचार आणि औषधं सुचवली होती. मात्र वार्धक्याने बाजीराव या पांढऱ्या वाघाचा आज सकाळी मृत्यू झाला. बाजीराव या वाघाची त्वचा जतन करणे शक्य होणार नाही. त्यामुळे टॅक्सीडर्मी होणार नसल्याचे वन्यजीव जतन तज्ज्ञ डॉक्टर संतोष गायकवाड यांनी स्पष्ट केले. या वाघाच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर त्याच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले असे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.
या वाघाचे हृदय, यकृत, किडनी यासह इतर महत्त्वाचे अवयव निकामी झाले होते असे शवविच्छेदन अहवालात नमूद करण्यात आले आहे. वार्धक्याने या वाघाचा मृत्यू झाला. या वाघाच्या मृत्यूमुळे वन्यप्रेमी दुःखी झाले आहेत. या वाघाचे वय १८ वर्षे होते तो त्याचे सरासरी वय जगला असेही शवविच्छेदन अहवाला नमूद करण्यात आले आहे. बाजीराव हा संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे मुख्य आकर्षण होता.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on May 3, 2019 6:08 pm