मागणीत दीडपट वाढ; मात्र निर्बंधांमुळे वितरणावर मर्यादा

पुणे : करोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या कडक निर्बंधांमुळे सलग दुसऱ्या वर्षी बालसाहित्य वाचनाच्या आनंदापासून बालकुमार दूरच राहिले आहेत. दुकाने बंद असल्याने या पुस्तकांच्या खरेदीसाठी केवळ ऑनलाइन माध्यमावरच विसंबून राहावे लागत आहे. त्यामुळे बालसाहित्याने नटलेली पुस्तके वाचकांपर्यंत पोहोचण्यात मर्यादा आल्या आहेत.

करोना प्रादुर्भावामुळे गेल्या वर्षी मार्चपासूनच टाळेबंदीमुळे सारे व्यवहार ठप्प झाले होते. पुस्तकांची दुकाने बंद असल्याने बालकुमार वाचक साहित्य वाचनाचा आनंद घेऊ शकले नाहीत. तशीच परिस्थिती दिवाळीच्या सुटीमध्ये कायम राहिली होती. करोना रुग्णांची संख्या वाढल्यामुळे सध्या निर्बंध लागू करण्यात आले आहेत. केवळ अत्यावश्यक वस्तूंचा अपवाद वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्याच्या आदेशामध्ये पुस्तकांच्या दुकानांचाही समावेश आहे. त्यामुळे मुलांचा आनंद द्विगुणित करणारे बालसाहित्य मुलांपर्यंत पोहोचू शकत नाही. या वास्तवावर ज्योत्स्ना प्रकाशनचे विकास परांजपे आणि प्रथम बुक्सच्या संपादक संध्या टाकसाळे यांनी बोट ठेवले आहे.

परांजपे म्हणाले, की दुकाने बंद असल्याने बालसाहित्याच्या पुस्तकविक्रीवर मर्यादा आली आहे. शाळा सुरू असतील तर त्याचा फायदा बालसाहित्याच्या पुस्तकांना होतो. शाळा ग्रंथालयासाठी पुस्तकांची खरेदी करतात. विविध स्पर्धांतील विजेत्यांना पारितोषिक देण्यासाठी पुस्तकांची खरेदी केली जाते. गेल्या वर्षीच्या टाळेबंदीच्या तुलनेत यंदा बालसाहित्याच्या पुस्तकांना मागणी दीडपटीने वाढली आहे.

‘अ‍ॅमॅझॉन’, ‘फ्लिपकार्ट’ यांसारख्या माध्यमांना सध्या फक्त अत्यावश्यक वस्तूंच्या सेवेची परवानगी देण्यात आली आहे. त्यामध्ये पुस्तकांचा समावेश केला तर त्याचा मोठा फायदा होईल. त्यांचा ग्राहक वर्ग मोठा आहे. ‘अन्न’ या वर्गवारीमध्ये चॉकलेट, कॅडबरी या चैनीच्या गोष्टींचा समावेश असल्याने ते ग्राहकांना मिळू शकते. तसेच पुस्तकांचे होईल. ललित साहित्य आणि वाचनानंदासाठीची पुस्तके तर मिळतीलच; पण शैक्षणिक, स्पर्धा परीक्षांची पुस्तके या सर्वांची गरज आहे. सरकारने या प्रस्तावाचा विचार केल्यास घरामध्ये अडकलेल्यांना दिलासा मिळेल. सुरक्षित अंतराचे पालन केले जात नाही इतकी गर्दी पुस्तकांच्या दुकानांमध्ये होत नाही. त्यामुळे निर्बंधांतून पुस्तकांना सवलत द्यावी, अशी मागणी परांजपे यांनी केली.

टाकसाळे म्हणाल्या, ‘प्रथम बुक्स’ने ‘स्टोरीव्हिवर’ या डिजिटल व्यासपीठावर वेगवेगळ्या भाषांतील बालसाहित्याची पुस्तके विनामूल्य उपलब्ध करून दिली आहेत. ही पुस्तके पीडीएफ स्वरूपात पाहणे आणि डाऊनलोड करून घेणे शक्य होते. नव्या पुस्तकांची निर्मिती जोमाने सुरू आहे. गोष्टीची पुस्तके मुलांना वाचायला हवी आहेत. मुलांसाठी वाचनकौशल्य आणि भाषा या दोन्ही गोष्टींसाठी ही पुस्तके उपयुक्त ठरतात.

पालकांना पुस्तके हवीत…

टाळेबंदीमुळे टीव्ही अधिक वेळ पाहणाऱ्या मुलांना त्या माध्यमापासून दूर नेत त्यांचे रंजन करण्यासाठी पालकांना पुस्तके हवी आहेत. मुलांना पुस्तके वाचून दाखविण्याबाबत पालकांमध्ये जागरूकता येत आहे. त्यामुळे संकेतस्थळावर मुलांच्या पुस्तकांना मागणी वाढली आहे.

अत्यावश्यक बाब नसल्याने…

गेल्या वर्षीच्या टाळेबंदीच्या तुलनेत यंदा बालसाहित्याची मागणी दीडपटीने वाढली आहे. मात्र, राज्य शासनाच्या अत्यावश्यक वस्तूंच्या सूचीमध्ये पुस्तकांचा समावेश नसल्याने पुस्तकांच्या विक्रीत अडचणी येत आहेत.