शिवेसनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक त्यांच्या कर्तृत्वाला साजेसे व्हावे, यासाठी मुंबईच्या प्रथम नागरिक, अर्थात महापौरांवर, लवकरच स्थलांतराची वेळ ओढवणार आहे. शिवाजी पार्क परिसरातच स्मारक उभारण्याचा शिवसेनेचा आग्रह लक्षात घेऊन ‘महापौर निवासा’च्या जागेतच हे स्मारक उभारण्याची योजना आखली जात आहे. मात्र त्यावर महापालिका प्रशासन आणि सत्ताधारी यांच्यात एकमत होत नसल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यातील चर्चेनंतरच अंतिम निर्णय होणार असल्याची माहिती मंत्रालयातील उच्चपदस्थ सूत्रांनी दिली.
शिवसेनेचा जन्म दादरमध्ये झाला. एवढेच नव्हे तर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या अनेक सभाही शिवाजी पार्क  मैदानावर गाजल्या. शिवसेना, बाळासाहेब ठाकरे आणि शिवाजी पार्क यांचे अतूट नाते असल्याने ठाकरे यांचे स्मारक याच भागात व्हावे असा शिवसेनेचा हट्ट आहे. त्यामुळे ठाकरे यांच्या स्मारकासाठी योग्य जागा शोधण्यासाठी सरकारने मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती. या समितीने वडाळा, चेंबूर, शिवाजी पार्कसह, महापौरांच्या बंगल्या शेजारील आणि त्याच्यात काही अंतरावर असलेल्या क्रीडा संकुलाच्या जागेची पाहणी करून त्यातून अंतिम दोन-तीन जागांचा अहवाल तयार केला आहे. त्यात महापौर निवासस्थान आणि त्याच्या आजूबाजूला असलेली जागा स्मारकासाठी सर्वात योग्य असल्याने त्याच ठिकाणी हे स्मारक उभारण्याचा घाट घातला जात आहे. त्यासाठी कंबाला हिल परिसरातील ‘९, एम. एल. डहाणूकर मार्ग’ हे महापालिका आयुक्तांचे आलिशान निवासस्थान महापौरांना देण्यात येणार असून आयुक्तांना अन्यत्र नवीन निवासस्थान उपलब्ध करून देण्यात येणार आहे. महापालिका प्रशासनाने मात्र या प्रस्तावास विरोध करताना महापौर निवासाचे महत्त्व लक्षात घेता या प्रस्तावास नागरिकांचा विरोध होऊ शकतो आणि प्रकरण न्यायालयातही जाऊ शकते अशी शंका उपस्थित केली आहे.
मात्र शिवसेनाप्रमुखांच्या स्मृती चिरतंन जतन करण्यासाठी महापौर निवास हीच योग्य जागा असल्याची भूमिका शिवसेनेतील काही मंडळींनी घेतली आहे. त्यामुळे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून मुख्यमंत्रीच अंतिम निर्णय घेतील, असेही सूत्रांनी सांगितले. याबाबत मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करूनही ते भेटू शकले नाहीत. तर महापौर स्नेहल आंबेकर या शहराबाहेर असल्याचे त्यांच्या निवासस्थानातून सांगण्यात आले.