शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी त्यांच्या जयंतीदिनी म्हणजे २३ जानेवारीला शिवाजी पार्क येथील महापौर निवासस्थानी गणेशपूजन होणार आहे. हा समारंभ छोटेखानी असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष अमित शहा यांना आमंत्रित करण्याचा प्रश्नच नाही, मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या समारंभास उपस्थित राहतील, असे शिवसेनेतील सूत्रांनी सांगितले.

बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर स्मारकाची घोषणा झाली. पण गेली पाच-सहा वर्षे ते काम रखडले. आता शिवाजी पार्क येथील महापौर बंगल्यात आणि भूमिगत स्वरूपात हे स्मारक केले जाईल. महापौर निवासाच्या वास्तूमध्ये सकाळी ११ वाजता समारंभ होणार असल्याचे शिवसेना प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले. मात्र, मुंबईच्या विकास आराखडय़ातील तरतुदीनुसार आणखी एक परवानगी मिळालेली नाही, असे ते म्हणाले.