राज्यातील ग्रामीण भागाचा विकास जलदगतीने होण्यासाठी ग्रामपंचायती अधिक सक्षम होणे गरजेचे असून त्यासाठी बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत व महिला सक्षमीकरण अभियानाची घोषणा अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली. त्याचप्रमाणे महिला बचत गटांना शून्य टक्के व्याजाने कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी १० कोटी, तर गावांचा शाश्वत विकास घडवून आणण्यासाठी स्मार्ट गाव योजना सुरू करण्यात येणार आहे.
बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत व महिला सक्षमीकरण अभियानाच्या माध्यमातून नवीन ग्रामपंचायतींचे बांधकाम, जिल्हा परिषद प्रभाग बळकट करणे तसेच ग्रामपंचायतींच्या नियोजनात महिलांच्या संस्थांचा सहभाग वाढविणे आदी बाबींचा समावेश असून त्यासाठी एक कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे महिला बचत गटांना शून्य टक्के व्याजदराने कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी सुमतीताई सुकळीकर उद्योगिनी महिला सक्षमीकरण योजना जाहीर करण्यात आली असून, त्यासाठी १० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या योजनेसाठी आवश्यकतेनुसार अतिरिक्त निधी उपलब्ध करून दिला जाईल, असेही अर्थमंत्र्यांनी सांगितले.