शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या इच्छापत्राचा वाद परस्पर सामंजस्याने सोडवण्याचा सल्ला मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी उद्धव व जयदेव या ठाकरे बंधूंना दिला. त्यावर याबाबत मंगळवारी भूमिका स्पष्ट करू असे दोघांनी सांगितल्याने हा वाद पुढे सुरू राहणार की मिटणार हे ठरणार आहे.
बाळासाहेबांचे इच्छापत्र तयार करणारे वकील फ्लेमिनीन डिसोजा यांची साक्ष शुक्रवारी पूर्ण झाली. ती सुरू पुढे सुरू करण्यापूर्वी न्या. गौतम पटेल यांनी  हा वाद परस्पर सामंजस्याने सोडविण्याचा सल्ला दिला. त्याबाबत त्यांनी वकिलांना दोन्ही ठाकरे बंधूंशी यासंदर्भात चर्चा करून त्याबाबत कळविण्यासही सांगितले. परंतु उद्धव यांच्याशी संपर्क होऊ शकत नसल्याचे त्यांच्या वकिलांनी सांगत सुनावणी तहकूब केल्याची मागणी केली. त्यावर मंगळवारी याबाबत आपण भूमिका स्पष्ट करू असे दोन्ही ठाकरे बंधूंच्या वकिलांकडून न्यायालयाला सांगण्यात आले. मात्र डिसोजा यांची अपूर्ण राहिलेली साक्ष पूर्ण करू देण्याची विनंती जयदेव यांच्या वकिलांकडून करण्यात आल्यावर न्यायालयाने ती मान्य करीत डिसोजा यांची साक्ष पुढे सुरू करण्यास सुरुवात केली.
बाळासाहेबांनी आपल्या एकाही सगळ्या इच्छापत्रांमधून कधीही कुणाचे नाव वगळले नसल्याची माहिती डिसोजा यांनी उलटतपासणीदरम्यान दिली. शेवटच्या इच्छापत्राबाबतच्या बैठका नोव्हेंबर २०११ च्या सुरुवातीला झाल्या होत्या. तसेच बाळासाहेब इच्छापत्र तयार झाले की त्याच्या नोंदी, आराखडे सुरुवातीला फाडून टाकत असत. नंतर मात्र ते मशीनद्वारे नष्ट करीत. इच्छापत्राबाबतच्या बैठकीसाठी आपण जेव्हा मातोश्रीवर गेलो. तेव्हा बाळासाहेबांना आपण त्यांच्या शयनगृहातच भेटल्याचे आणि ते नेहमी कॉटवर असल्याचे डिसोजा यांनी सांगितले. त्यांच्या कॉटच्या बाजूला असलेल्या खुर्चीत बसून आपण त्यांच्याशी इच्छापत्राबाबतची चर्चा केल्याची माहिती डिसोजा यांनी दिली.