शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर अंत्यसंस्कार झालेली भूमी शिवसैनिकांना अयोध्येइतकीच पवित्र असून स्मारक तेथेच झाले पाहिजे, असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मंगळवारी सांगितले. तसेच या मुद्यावर सरकार आणि न्यायालयाने ताणून धरू नये, असा इशाराच राऊत यांनी दिल्याने स्मारकाबाबतच्या वादाचे रूपांतर आता सरकार विरुद्ध शिवसेना या वादात होण्याची चिन्हे आहेत.
शि़ळसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे अंत्यसंस्कार ज्या जागेवर झाले, ती जागा शिवसैनिकांसाठी मंदिराइतकी पवित्र आहे,  त्यामुळे त्या ठिकाणी असलेले बांधकाम कोणत्याही परिस्थितीत हटवू देणार नाही. सरकार आणि न्यायालयानेदेखील या मुद्दय़ावर ताणून धरू नये, असे राऊत म्हणाले. या जागेवर आता शिवसैनिकांचा खडा पहारादेखील सुरू झाला आहे.
बाळासाहेबांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झालेल्या परिसर शिवसैनिकांनी संरक्षित केल्याने, कायदा हातात घेऊ नका, असे बजावणारे सरकार आता कोणती भूमिका घेते याकडे लक्ष लागले आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विक्रमी सभांमुळे या मैदानाशी त्यांचे नाते असले, तरी त्यांच्या पश्चात स्मारक उभारण्याच्या मागणीमुळे क्रीडाप्रेमी बेचैन आहेत.