बाळासाहेबांची आणि माझी पहिली भेट नेमकी कधी झाली, कुठे झाली हे मला नीटसं आठवत नाही. पण, तरीही ते सत्तरचं दशक असावं असं वाटतं. कुठल्याशा समारंभात माझी त्यांच्याशी ओळख करून दिली गेली. अर्थात, तेव्हा अगदीच औपचारिक पध्दतीने माझी त्यांच्याशी ओळख झाली होती पण, तरी आज इतक्या वर्षांनंतरही ती आठवण ताजी आहे. बाळासाहेबांबद्दलच्या अनेक आठवणी आज मनात दाटून येत आहेत.  १९८२ मध्ये मी मनमोहन देसाईंच्या कुली चित्रपटाच्या सेटवर जखमी झालो. खूप गंभीररित्या जखमी झालो होतो. ब्रीच कॅेडी रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात माझी जीवन-मरणाची झुंज सुरू होती. त्यावेळी तिथे माझ्या कुटुंबाबरोबर ठाकरे परिवारातील प्रत्येक सदस्याने माझी जी देखभाल केली त्याला तोड नाही. त्यांच्या घरातील कोणी ना कोणी सदस्य नेहमी रूग्णालयात येत राहिले, माझ्यासाठी त्यांनी प्रार्थनाही केल्या. माझ्या बरं होण्यात त्यांनी दिलेल्या सदिच्छांचा मोलाचा वाटा होता यात कोणतीही शंका नाही. त्यांनी मला नेहमीच आपलं मानलं आहे.
त्यादरम्यान, घडलेली एक घटना मला नेहमीच आश्चर्यचकित करते. सगळ्यांनाच माहिती आहे की बाळासाहेब हे एक प्रसिध्द व्यंगचित्रकार आहेत. पण, त्यांनी बनवलेलं एक व्यंगचित्र मला त्यांच्याजवळ घेऊन गेलं. त्यांनी यमराजाचं एक व्यंगचित्र रेखाटलं होतं आणि त्यांनी त्या यमराजाला धमकी दिली होती की ब्रीच कँडी रूग्णालयाच्या आसपासही भटकायचं नाही. जर यमराज तिथे कुठे दिसलाच तर त्याचे परिणाम चांगले होणार नाहीत. हे एक धाडसी आणि अनोखे व्यंगचित्र होते. त्यांना माझ्याबद्दल किती प्रेम, किती ओढ होती किती चांगली भावना होती हे त्या व्यंगचित्रावरून मला जाणवलं.  माझ्यावर संकटाचे पहाड कोसळत होते, आरोपांच्या चक्रात मी पिसला जात होतो, दूरदूपर्यंत मला सहानुभूतीचा किरण दिसत नव्हता, त्या कसोटीच्या क्षणी बाळासाहेब मला अंधारात एखाद्या दिव्यासारखे भासत होते. गरजेला उपयोगी पडतो तो खरा मित्र. या जगात माझे मित्र असेच आहेत जे त्यावेळेला मला उपयोगी पडले ज्यावेळी माझ्याबरोबर कोणी नव्हतं. काहीही असो.. ज्या पध्दतीने त्यांनी मला मानसिक आधार दिला त्यामुळेच मी जगाचा सामना करू शकलो. माझा आत्मविश्वास त्यांनी मला परत मिळवून दिला. त्यांचं प्रोत्साहन मला मिळालं नसतं तर मी एक साधारण माणूस आरोपांखाली दबून मेलो असतो. जगाशी लढण्याची शक्ती त्यांनी मला दिली त्यामुळेच मी न घाबरता साहसीपणे जगाचा सामना केला. प्रसारमाध्यमांना भेटलो, पत्रकारांना भेटलो. त्यांना माझी बाजू सांगितली. माझी भूमिका सत्याची आहे हे पटवून देण्यासाठी मला कोर्टकचेऱ्याही कराव्या लागल्या. पण, अखेर सत्यच जिंकले. या सगळ्या कसोटीच्या क्षणी बाळासाहेबांनीच मला साथ दिली. बाळासाहेबांच्या व्यक्तिमत्त्वाचा आणखी एक पैलू माझ्या लक्षात आला तो म्हणजे ते नेहमी सत्य बोलतात. जी गोष्ट त्यांच्या मनात असते तीच गोष्ट त्यांच्या तोंडावर असते. त्यांचे सत्य बोलणे जो सहन करू शकत नाही तो त्या गोष्टींचा वेगळा अर्थ लावतो. त्याला त्या चुकीच्या वाटतात. बरेचसे लोक सत्यापासून फारकत घेतात. पण, जो त्यांच्या सत्य बोलण्यावरून त्यांच्याशी फारकत घेतो त्यांची पर्वा बाळासाहेब कधीच करत नाहीत. त्यांचे बोल तिखट असतात पण ते सत्याचे असतात आणि म्हणूनच ते कित्येकदा कटू वाटतात.
बाळासाहेबांच्या व्यक्तिमत्त्वाचे असे अनेक अस्पर्शित पैलू आहेत ज्यांच्याविषयी कदाचित सांगणंही शक्य होणार नाही.  त्यांच्यासारखा मित्र मिळणं हे खरोखरच माझं भाग्य होतं!
 बाळासाहेबांच्या अमृतमहोत्सवानिमित्त प्रकाशित करण्यात आलेल्या गौरवग्रंथातून साभार