रविवारचा दिवस म्हणजे मेगाब्लॉक असूनही रेल्वेस्थानकांवर तुफान गर्दी, चहाच्या टपऱ्यांपासून हॉटेलांपर्यंत सर्वत्र गजबज..पण नेहमीचे चित्र रविवारी पालटलेले होते, कायम गजबजलेला महामुंबईचा परिसर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनाने सुन्न झाला होता. शिवाजी पार्ककडे जाणाऱ्या रस्त्यांवर अथांग जनसागर लोटला असताना इतरत्र सर्वत्र एक खिन्न शांतता वातावरणात पसरली होती. शांतता असूनही कुठेही वातावरणात तणाव नव्हता. मुंबईकरांनी उत्स्फूर्तपणे बंद पाळत बाळासाहेबांना श्रद्धांजली वाहिली.
शिवसेनाप्रमुखांवर रविवारी शिवाजी पार्कवर अंत्यसंस्कार होणार असल्याने रेल्वेच्या तिन्ही मार्गावरील मेगाब्लॉक रद्द झाला होता. मात्र तरीही जवळपास सर्वच रेल्वेस्थानकांवर शुकशुकाट होता. नेहमी शेकडो प्रवासी असलेल्या फलाटांवर मोजकी पाच-पन्नास डोकी दिसत होती. फलाटावरील मासिक-वर्तमानपत्रांचा स्टॉल सोडला तर खाण्या-पिण्याचे स्टॉल बंद होते. केवळ छत्रपती शिवाजी टर्मिनसवरील उपहारगृह सुरू होते. साहजिकच पाणी व खाद्यपदार्थासाठी प्रवाशांची तेथे तुडुंब गर्दी उसळली होती. त्यामुळे गर्दीवर नियंत्रणासाठी रेल्वे पोलिसांनी प्रवाशांना रांग लावण्यास सांगत प्रश्न सोडवला.
अवघ्या मुंबईत आणि उपनगरांतही उत्स्फूर्त बंद होता. सकाळी सकाळी घरपोच मिळणारे दूधही लोकांच्या घरात पोहोचले नाही. मुंबईच्या उपनगरांपासून दूर ठाणे, कल्याण-डोंबिवलीपर्यंतच्या भागात सर्व दुकाने बंद होती. साधी चहाची टपरीसुद्धा कुठे सुरू नव्हती. टॅक्सी, रिक्षा रस्त्यांवरून गायब होत्या. प्रवाशांना बससेवेचा आधार होता. रस्त्यांवर मोजके लोक होते. सगळीकडेअसा शुकशुकाट पसरला असताना वातावरणात तणाव वा दहशत मात्र कुठेही नव्हती. रस्त्यावर जी काही थोडीबहुत माणसे होती निश्चिंतपणे ये-जा करत होती.
रविवार म्हणजे बहुसंख्य मुंबईकरांसाठी सामिष भोजनाचा दिवस. मटण, चिकन, माशांच्या विक्रेत्यांकडे दुपापर्यंत रांगा लागलेल्या असतात. पण बाळासाहेबांच्या निधनामुळे बहुतांश ठिकाणी ही दुकानेही बंद होती. अगदी अपवादात्मक ठिकाणी थोडीफार विक्री सुरू होती.

पोलिसांसाठी खाद्यपदार्थ पाकिटे
आजच्या बंदमुळे बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांची उपासमार होऊ नये यासाठी मुंबई पोलिसांनी विशेष सोय केली होती. शहरात ठिकठिकाणी बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांच्या पथकांना पाणी व खाद्यपदार्थाची पाकिटे खास गाडय़ांमधून पोचवण्यात येत होती. या नियोजनामुळे बंदोबस्तावरील पोलिसांना मोठा दिलासा मिळाला.