22 November 2017

News Flash

पर्व संपले!

मराठी माणसाच्या मनात अस्मितेची जाज्वल्य ठिणगी चेतवितानाच देशाच्या व महाराष्ट्राच्या राजकारणावर आपल्या दमदार व्यक्तिमत्त्वाचा

विशेष प्रतिनिधी, मुंबई | Updated: November 18, 2012 3:47 AM

मराठी माणसाच्या मनात अस्मितेची जाज्वल्य ठिणगी चेतवितानाच देशाच्या व महाराष्ट्राच्या राजकारणावर आपल्या दमदार व्यक्तिमत्त्वाचा ठसा उमटविणारे बाळासाहेब ठाकरे नावाचे ‘भगवे वादळ’ शनिवारी अखेर निमाले. गेल्या साडेचार दशकांपासून आपला कुंचला, धारदार लेखणी आणि प्रखर वाणीने मनामनामध्ये मराठीपणाचा अभिमान फुलविताना असंख्य वादळे अंगावर झेलून ती लीलया परतविणाऱ्या बाळासाहेबांनी मृत्यूशीदेखील प्रचंड धैर्याने झुंज दिली आणि अखेर शनिवारी दुपारी ३.३३ वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. या वृत्ताने अवघा महाराष्ट्र शोकाकुल झाला. त्यांच्या दर्शनासाठी ‘मातोश्री’च्या परिसरात गेल्या चार दिवसांपासून आतुरतेने जमलेल्या असंख्य चाहत्यांना तर या वृत्ताने असह्य़ धक्का बसला. शोकाकुल शिवसैनिकांच्या डोळ्यांतून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या..
गेल्या बुधवारपासून बाळासाहेबांची प्रकृती अधिकच खालावल्याने त्यांच्या असंख्य चाहत्यांनी आपल्या या दैवताची भेट घेण्यासाठी मातोश्रीवर धाव घेतली होती. बाळासाहेबांच्या आरोग्यासाठी प्रार्थना, यज्ञयाग, मंत्रजप सुरू झाले होते. चाहत्यांच्या या सदिच्छांच्या बळावर गेले चार दिवस बाळासाहेबांनी मृत्यूशी जबरदस्त सामना केला. या काळात देशातील असंख्य चाहत्यांची मातोश्रीवर अक्षरश: रीघ सुरू होती, आणि हजारो शिवसैनिक बाळासाहेबांच्या दर्शनासाठी आसुसले होते. बाळासाहेब उपचारांना सकारात्मक प्रतिसाद देत असून ते लवकरच दर्शन देतील असा दिलासा शुक्रवारीच शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिला होता. त्यामुळे शनिवारी सकाळी पुन्हा मातोश्रीबाहेर दाटलेल्या गर्दीतून बाळासाहेबांच्या दर्शनाची उत्कट आस उमटताना दिसत होती. ‘दर्शन दे रे, दे रे भगवंता.. किती अंत आता पाहसी अनंता..’  अशा करुणामयी काव्यपंक्ती असलेले फलक हाती घेऊन शिवसैनिकांची रीघ सकाळपासूनच मातोश्रीबाहेर प्रतीक्षा करत होती..
.. दुपारी तीनच्या सुमारास अचानक पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात झाली. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, त्यांच्या पत्नी शर्मिला व मनसेचे आमदार नितीन सरदेसाई घाईघाईने मातोश्रीवर दाखल झाले, तेव्हाही बाहेरच्या गर्दीला नेमके काय झाले त्याचा अंदाज नव्हताच, पण शंकेची पाल चुकचुकल्याने गर्दीतील अस्वस्थता वाढली होती. सेनेचे अन्य नेते, भाजपचे गोपीनाथ मुंडे, विनोद तावडे तातडीने दाखल झाले, पोलिसांचीही धावपळ सुरू झाली आणि काहीतरी अप्रिय घडल्याच्या शंकेने मातोश्रीच्या परिसरावर शोकाचे सावट दिसू लागले. संध्याकाळचा सूर्य मावळतीकडे झुकू लागला, उन्हेदेखील उदासवाणी झाली आणि हे सावट अधिकच दाट होऊ लागले.. सगळ्या नजरा आणि कानही मातोश्रीकडे एकवटले.. मधूनच एखादा अनावर हुंदकाही फुटू लागला आणि दु:खाची लाट पसरू लागलेली असतानाच, गेल्या काही दिवसांपासून अथकपणे बाळासाहेबांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवणारे डॉ. जलील परकार बाहेर आले. त्यांच्यासोबत खासदार संजय राऊत, दिवाकर रावते व अन्य पदाधिकारीही पत्रकारांसमोर आले. सगळ्यांच्याच चेहऱ्यावर वेदनेची रेषा स्पष्ट उमटली होती. त्यामुळे शिवसैनिक अस्वस्थ झाले, शोकाची एक लाट उसळली आणि डोळ्यांतील अनावर अश्रूंना वाट करून देणाऱ्या असंख्य शिवसैनिकांच्या कानावर डॉ. परकार यांच्याकडून ती अस्वस्थ करणारी वार्ता आदळली..  
आपल्या जगण्याला अस्मितेची धार देणारा आधारवड उन्मळून पडल्याच्या भावनेने लहानथोर शिवसैनिकांना शोकावेग अनावर झाला.. बाळासाहेबांच्या दर्शनासाठी गेले चार दिवस मातोश्रीबाहेर प्रतीक्षा करणारे असंख्य शिवसैनिक अक्षरश: कोलमडून रडू लागले.. कुणीच कुणाशी बोलत नव्हते. वातावरण सुन्न झाले.. पोलिसांनीदेखील यांत्रिकपणे सुरक्षेच्या हालचाली सुरू केल्या.. मातोश्रीचा परिसर दु:खाच्या लाटेत बुडून गेला होता..
बाळासाहेबांच्या निधनाची दु:खद वार्ता दूरचित्रवाणीच्या माध्यमातून घराघरांत पोहोचली आणि मातोश्रीबाहेरचा शोक अवघ्या मुंबईभर पसरला. मुंबई सुन्न झाली.. काल संध्याकाळनंतर पूर्वपदावर येऊ घातलेली मुंबई पुन्हा शोकाने काळवंडली.. आणि मातोश्रीवर रीघ सुरू झाली. संध्याकाळनंतर पुन्हा मातोश्रीच्या परिसरात अलोट गर्दी जमली.. केवळ अश्रू आणि हुंदके, अनावर दु:खावेग आणि आधार गमावल्याच्या शोकमग्न भावनेतच सूर्यास्त झाला..  

अंत्यसंस्कार शिवतीर्थावरच
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची अंत्ययात्रा रविवारी सकाळी सात वाजल्यापासून वांद्रे येथील ‘मातोश्री’ निवासस्थानापासून निघेल आणि दादरला शिवाजी पार्कवर पोचेल. त्यानंतर सकाळी १० वाजल्यापासून शिवाजी पार्क मैदानावर त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवले जाणार असून सायंकाळी सहा वाजता शिवतीर्थावर अंत्यसंस्कार केले जातील, असे शिवसेनेचे प्रवक्ता खासदार संजय राऊत यांनी सांगितले.

अग्रलेख  : पहाड प्रस्थान

First Published on November 18, 2012 3:47 am

Web Title: balasaheb thackeray dies mumbai comes under security blanket