News Flash

उद्धव ठाकरे, अजित पवार, बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत बाळासाहेब ठाकरे स्मारक भूमिपूजन सोहळा संपन्न!

स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचा भूमिपूजन सोहळा आज संपन्न झाला.

बाळासाहेब ठाकरे स्मारकाचा भूमिपूजन सोहळा

बुधवारी सकाळपासूनच मुंबईच्या राजकीय वर्तुळात स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या भूमिपूजन सोहळ्याची चर्चा होती. या कार्यक्रमाला राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना निमंत्रण देण्यात आलं नसल्याच्या मुद्द्यावरून आरोप-प्रत्यारोप केले जात होते. तर सरकारकडून मात्र मोजक्या मान्यवरांच्या उपस्थितीतच सोहळा आयोजित केल्याचं सांगितलं जात होतं. या सर्व राजकीय पार्श्वभूमीवर संध्याकाळी ५.३० वाजता हा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला. या सोहळ्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि राज्य सरकारमधील महसूल मंत्री बाळासाहेब थोरात हे महाविकास आघाडीतले तीन प्रमुख नेते उपस्थित होते. त्यामुळे एकूणच या सोहळ्याला महाविकासआघाडीचा सोहळा असंच स्वरूप आल्याचं पाहायला मिळालं.

महाविकासआघाडीतील प्रमुख नेत्यांची उपस्थिती

या सोहळ्यामध्ये सुरुवातीला बाळासाहेब ठाकरेंचे पुत्र आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते भूमिपूजनाचा विधी पार पडला. त्यानंतर त्यांच्या हस्ते स्मारकाच्या आवारातच वृक्षारोपण केलं गेलं. त्यानंतर महाविकास आघाडीतील दुसरा प्रमुख पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं. आणि सरतेशेवटी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते देखील वृक्षारोपण करण्यात आलं. त्यामुळे महाविकास आघाडीतील तिनही प्रमुख पक्षांच्या राज्यातील प्रमुख नेत्यांचा या सोहळ्यामध्ये सहभाग होता.

देवेंद्र फडणवीस, राज ठाकरेंना निमंत्रण नाही!

दरम्यान, बाळासाहेब ठाकरेंचं स्मारक हा सरकारी कार्यक्रम असल्यामुळे या कार्यक्रमाला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना देखील निमंत्रित केलं जाईल अशी अपेक्षा होती. मात्र, तसं झालं नाही. त्यामुळे भाजपाच्या नेतेमंडळींकडून त्यावर तीव्र शब्दांमध्ये टीका केली गेली. नितेश राणे यांनी देखील “आज बाळासाहेब असते तर पहिलं निमंत्रण देवेंद्र फडणवीसांना दिलं असतं”, असं म्हणत निशाणा साधला होता.

मनसे अध्यक्ष आणि बाळासाहेब ठाकरेंचे पुतणे राज ठाकरे यांना देखील कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यात आलेलं नव्हतं. त्यावरून देखील मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी निशाणा साधत “सरकार पडण्याची भिती होती म्हणून इतक्या घाईत भूमिपूजन सोहळा करून घेतला”, अशी खोचक टीका केली आहे. कुलाबा येथे काही महिन्यांपूर्वी बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिकृतीचं अनावरण करण्यात आलं होतं. त्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजपा, मनसे, रिपाइं असे सर्वपक्षीय नेते उपस्थित होते. मात्र, यावेळी फक्त महाविकासआघाडी सरकारमधल्याच पक्षातील नेत्यांना आमंत्रण दिल्यावरून टीका केली जात होती.

मुंबईतील जुन्या महापौर निवासस्थानाची वास्तू बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकासाठी अंतिम करण्यात आली असून तिथे बाळासाहेब ठाकरेंचं स्मारक उभारलं जाणार आहे. त्यासाठी आज भूमिपूजन सोहळा संपन्न झाला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 31, 2021 6:15 pm

Web Title: balasaheb thackeray memorial bhoomi pujan program cm uddhav thackeray ajit pawar present pmw 88
Next Stories
1 “अंबानींच्या घराजवळ वाझेंच्या ड्रायव्हरनं पार्क केली होती स्कॉर्पिओ”
2 करोना रुग्णासाठी बेड मिळवायचा असेल तर कुठे संपर्क कराल? पालिकेचे अधिकृत दूरध्वनी क्रमांक जारी!
3 परमबीर सिंह यांना उच्च न्यायालयाने सुनावलं; विचारले अनेक प्रश्न
Just Now!
X