उमाकांत देशपांडे

शिवसेनेला खूश करण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडून शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकातील अडथळे दूर

आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन शिवसेनेला खूश करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या मार्गातील सर्व अडथळे दूर करून शिवाजी पार्क येथील महापौर निवासाची जागा स्मारक ट्रस्टला हस्तांतरित केली आहे. शिवसेनेने आता शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकाचे भूमिपूजन त्यांच्या पुण्यतिथी दिनी १७ नोव्हेंबरला करण्यासाठी तयारी सुरू केली असून त्याबाबतची घोषणा दोन-चार दिवसात उद्धव ठाकरे हे करणार असल्याचे पक्षाच्या ज्येष्ठ नेत्याने ‘लोकसत्ता’ला सांगितले.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निधन १७ नोव्हेंबर २०१२ रोजी झाले होते. शिवसेनेच्या पाठिंब्यावर भाजपच्या नेतृत्वाखालील सरकार स्थापन झाल्यावर १७ नोव्हेंबर २०१५ रोजी तृतीय पुण्यतिथीला मुख्यमंत्री फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकाची घोषणा केली होती. उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली ट्रस्ट स्थापन करून वर्षभरात महापौर बंगल्यातील स्मारकाचे काम पूर्ण होईल, असेही जाहीर केले होते.

मात्र महापौर बंगल्याचे हस्तांतरण रखडले, त्याचबरोबर महापौर बंगल्याच्या आजूबाजूची काही जागाही लागणार असून एका नर्सरी शाळेची जागाही ताब्यात घ्यावी लागणार आहे.

महापौरांनाही भायखळा येथील जिजामाता उद्यानात पर्यायी निवासस्थान दिले जाणार आहे. स्मारकासाठी विलंब होत असल्याने ठाकरे नाराज होते. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सूचना दिल्यावर स्मारकासाठी सुमारे सहा हजार चौरस फुटांच्या महापौर बंगल्याचे हस्तांतरण बुधवारी ट्रस्टला करण्यात आले. स्मारकाचा आराखडा सुप्रसिद्ध वास्तुरचनाकार शशी प्रभू यांनी तयार केला आहे.

त्यामुळे आता लगेच शिवसेनाप्रमुखांच्या पुण्यतिथीदिनी स्मारकाचे भूमिपूजन उद्धव ठाकरे व मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत करण्याचे नियोजन शिवसेना करीत आहे. ज्येष्ठ भाजप नेते लालकृष्ण अडवानी, सुषमा स्वराज यांनाही निमंत्रित करण्याचा विचार असल्याचे ज्येष्ठ शिवसेना नेत्यांनी सांगितले. शिवसेनाप्रमुखांची जयंती २३ जानेवारीला असून तोपर्यंत पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण करून शिवसेनाप्रमुखांच्या छायाचित्रांचे प्रदर्शनही आयोजित करण्यात येणार आहे.

जर भूमिपूजन २३ जानेवारीपर्यंत पुढे ढकलले, तर तोपर्यंत लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ते १७ नोव्हेंबरलाच करण्यासाठी पावले टाकण्यात येत असून त्याबाबतचा तपशील ठाकरे जाहीर करतील, असे सूत्रांनी स्पष्ट केले.