‘‘याद राख मुलीच्या जीवाशी खेळ केलास, तरा माझ्याशी गाठ आहे. मुलगी हुशार आहे. खेळात नैपुण्य मिळविण्याची जिद्द तिच्यात आहे. मग गोविंदामध्ये पाठवून तिच्या आयुष्याचे नुकसान करायचे आहे का? तिला समर्थ व्यायाम मंदिरात घाल. एक दिवस ती देशाचे नाव उज्ज्वल करेल..,’’ अशा शब्दात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मिलिंद लोके दाम्पत्याला दरडावले आणि मुंबईत आठ थराची पहिली दहीहंडी फोडणाऱ्या चिमुरडय़ा राजमुद्रा लोकेचे आयुष्यच बदलून गेले! दहीहंडीत बालगोविंदांचा समावेश असावा का, यावरून सध्या जोरात चर्चा सुरू असताना आपल्या लहानग्यांना वरच्या थरावर पाहण्याचे वेडगळ स्वप्न बाळगणाऱ्या पालकांच्या अविचाराची हंडी प्रथम शिवसेनाप्रमुखांनीच फोडल्याचे थेट राजमुद्रा आणि तिच्या वडिलांशी झालेल्या गप्पांतून उघड झाले. दोरीवरच्या मल्लखांबात नैपुण्य मिळविणारी राजमुद्रा केवळ मुंबईतच नव्हे, तर विदेशातही मल्लखांबाचे धडे देऊन आली आहे.
भायखळ्यातील आशीर्वाद गोविंदा पथकामधील अवघ्या सहा वर्षांची चिमुरडी राजमुद्रा सातव्या थरावर जाऊन लीलया दहीहंडी फोडत असल्याचे दक्षिण-मध्य मुंबई माझगाव ताडवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गोविंदा पथक प्रशिक्षकांनी हेरले. त्यांनी तिला आपल्या पथकात घेतल्यानंतर या पथकाने २००६मध्ये वरळी, अंधेरी आणि वाशी येथे आठ थर रचण्यात यश मिळविले. तिन्ही वेळी राजमुद्रा आठव्या थरावर होती.  या यशानंतर शिवसेनाप्रमुखांना भेटण्यासाठी राजमुद्रा आई-वडिलांसमवेत ‘मातोश्री’वर गेली होती. शिवसेनाप्रमुखांकडून आपल्या मुलीचा गौरव होणार याचा लोके दाम्पत्याला अत्यानंद झाला होता. बाळासाहेबांनी तिचे कौतुक केले, पण क्षणातच ते तिच्या आई-वडिलांवर कडाडले. ‘इतक्या लहान मुलीला आठव्या थरावर का चढवता? इतक्या लहान मुलींची हाडे नाजुक असतात. जर तिला हंडी फोडताना मार बसला तर तिच्या आयुष्याचे नुकसान होईल. गोविंदा उत्सव हा साहसी खेळ नाही. यापुढे तिला गोविंदामध्ये पाठवाल तर माझ्याशी गाठ आहे, असे बाळासाहेब ठाकरे यांनी मिलिंद लोके यांना दरडावले. असले धाडस करण्यापेक्षा तिला शिवाजी पार्कमधील उदय देशपांडे यांच्या समर्थ व्यायाम मंदिरात घेऊन जा, असा सल्ला बाळासाहेबांनी लोके यांना दिला.
      त्यानंतर गोविंदा पथकाला कायमचा रामराम ठोकून राजमुद्रा समर्थ व्यायाम मंदिरात गेली. आज ती एक उत्तम रोप मल्लखांबपटू आहे. २००७ ते २०१४ या काळात तिने ३९ वैयक्तिक सुवर्ण, ४८ सांघिक सुवर्ण, २४ वैयक्तिक रौप्य, २८ सांघिक रौप्य, १४ वैयक्तिक कांस्य, तर १२ सांघिक कांस्य पदकांची कमाई केली आहे.