|| संजय बापट

‘समृद्धी’चे नामकरण

मुंबई—नागपूर द्रुतगती समृद्धी महामार्गाचे काम  गतिमान झालेले नसले तरी त्याच्या नामकरणावरून निर्माण झालेला वाद उफाळून येण्याची शक्यता आहे. या महामार्गास  दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव देण्याचा भाजपचा प्रस्ताव मोडीत काढत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग असे या महार्गाचे नामांतर करण्याचा निर्णय सरकारने घेतला असून त्याची  घोषणा लकरच केली जाणार असल्याची माहिती मंत्रालयातील उच्चपदस्थ सूत्रानी दिली.

सुमारे ५६ हजार कोटी रूपये खर्चाच्या आणि मुंबई—नागपूर या शहरांमधील ७१० किलोमीटरचा प्रवास सहा तासांवर आणणाऱ्या ‘समृद्धी द्रुतगती महामार्गा’ची बांधणी तीन वर्षांंत करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. १२० मीटर रुंदीचा हा महामार्ग कोकण, नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर या पाच महसूल विभागांतील ठाणे, नाशिक, अहमदननिर्बंध, औरंगाबाद, जालना, बुलढाणा, वाशिम, अमरावती, वर्धा आणि नागपूर या १० जिल्ह्यमंतील २७  तालुक्यांच्या ३५० गावांमधून जाणार आहे.या प्रकल्पातील भूसंपादनासह बहुतांश अडथळे दूर होऊन प्रकल्पाचे काम सुरू झाल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या महामार्गाला  माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव देण्याची घोषणा केली होती.

हा प्रकल्प शेतकऱ्यांना उध्वस्त करणारा असल्याचा आरोप करीत अगोदर त्याला विरोध करणाऱ्या शिवसेनेने या प्रकल्पास बाळासाहेब ठाकरेचे नाव देण्याची मागणी केली होती.  गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात एका मंत्रिमंडळ बैठकीदरम्यान राज्य रस्ते विकास महामंडळाचे अध्यक्ष आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री(सार्वजनिक उपक्रम) एकनाथ शिंदे यांनी शिवसेना खासदार विनायक राऊत तसेच काही आमदारांसमवेत मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन या महामार्गास बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची मागणी केल्यानंतर या महामार्गाच्या नामांतरावरून युतीमधील बेबनाव उघड झाला होता.  देशातील पहिल्या वहिल्या मुंबई— पुणे द्रुतगती महामार्गाची मुहूर्तमेढही बाळासाहेबांनी रोवली होती. त्यामुळे देशातील या पहिल्या  द्रुतगती महामार्गाचे शिल्पकार असलेल्या बाळासाहेब ठाकरे यांच्या योगदानाचा, त्यांच्या दूरदृष्टीचा  यथोचित सन्मान व्हावा यासाठी समृद्धी महामार्गास बाळासाहेबांचे नाव देण्याची मागणी शिवसेनेने केली होती.

त्यावर या मार्गाला अटलजींचे नाव देण्याची घोषणा आपण यापूर्वीच केली आहे. अशा वेळी नको तो वाद कशाला निर्माण करता? अशाप्रकारे दबावाचे राजकारण खेळू नका अशा शब्दांत फडणवीस यांनी शिवसेना नेत्यांना सुनावले. तेव्हा फडणवीस आणि सेना नेत्यांमध्ये झालेल्या शाब्दीक वादानंतर या महामार्गास ठाकरेचे नाव न दिल्यास राजीनामा देण्याचा इशाराही शिवसेनेच्या मंडळींनी दिला होता. त्यानंतर नामांतराचा वाद दोन्ही पक्षांनी बाजूला ठेवला होता.  आता सत्तांतर होताच या महामार्गास ठाकरेंचे नाव देण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे. त्यानुसार याबाबतचा  प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना त्यांनी मुख्यसचिवाना दिल्यानंतर आता प्रशासन कामाला लागले आहे. मात्र नामांतराचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर आणण्याची आवश्यकता नसून सरकार थेट घोषणा करू शकत असल्याने आता याबातची घोषणा मुख्यमंत्री करतील अशी माहिती सूत्रांनी दिली.

५६ हजार कोटींचा खर्च

सुमारे ५६ हजार कोटी रुपये खर्चाच्या आणि मुंबई-नागपूर या शहरांमधील ७१० किलोमीटरचा प्रवास सहा तासांवर आणणाऱ्या ‘समृद्धी द्रुतगती महामार्गा’ची बांधणी तीन वर्षांत करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. तब्बल १२० मीटर रुंदीचा हा महामार्ग कोकण, नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर या पाच महसूल विभागांतील ठाणे, नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, बुलढाणा, वाशिम, अमरावती, वर्धा आणि नागपूर या १० जिल्ह्य़ांतील २७ तालुक्यांच्या ३५० गावांमधून जाणार आहे. या प्रकल्पातील भूसंपादनासह बहुतांश अडथळे दूर होऊन प्रकल्पाचे काम सुरू झाल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या महामार्गाला माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव देण्याची घोषणा केली होती.