काँग्रेसचे माजी नेते व विधानसभा विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आमदारकीचा तसेच विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता त्यांच्या जागेवर पक्षाने बाळासाहेब थोरात यांची वर्णी लावली आहे.

काँग्रेसच्या विधिमंडळ नेतेपदी आता बाळासाहेब थोरात असणार आहेत. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय विखे यांना नगरमधुन उमेदवारी न दिल्याने, सुजय विखे यांनी भाजपात प्रवेश करत लोकसभा निडवणुक लढवली व यात त्यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार संग्राम जगताप यांचा पराभव केला. काँग्रेसच्या या निर्णयामुळे नाराज झालेल्या राधाकृष्ण विखे पाटील यांनी या निवडणुकीत काँग्रेस आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार करणे उघडपणे टाळले होते. निवडणुक निकालानंतर त्यांनी भाजपात प्रवेश करत असल्याचे स्पष्ट संकेतही दिले. त्याच्याबरोबर काँग्रेसचे काही आमदारही भाजपाच्या वाटेवर असल्याची खात्री लायक माहिती आहे.

विजय वडेट्टीवार यांची विधानसभेच्या गटनेतेपदी तर आमदार नसीम खान यांच्याकडे उपनेतेपदाची जबाबदारी आहे. बसवराज पाटील यांची मुख्य प्रतोदपदी तर के.सी. पाडवी, सुनील केदार, जयकुमार गोरे, यशोमती ठाकूर आणि प्रणिती शिंदे यांची प्रतोदपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याबरोबरच विधान परिषदेच्या गटनेतेपदी शरद रणपिसे यांची तर उपनेतेपदी रामहरी रुपनवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे प्रतोदपदी भाई जगताप यांची नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेसचे सरचिटणीस के.सी. वेणूगोपाल यांनी या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत.