मुंबई : एक कोटी ७० लाख रुपयांच्या लाचप्रकरणी गुन्हा दाखल झालेले पुणे येथील भूमी अभिलेख उपसंचालक बाळासाहेब वानखेडे यांना अखेर निलंबित करण्यात आले आहे. वानखेडे यांच्याबद्दल अनेक गंभीर तक्रारी असतानाही त्यांची या पदावर नियुक्ती करण्याच्या प्रकाराची मुख्यमंत्री कार्यालयानेही गंभीर दखल घेतली आहे.

वानखेडे यांच्यासाठी लाच मागणाऱ्या अ‍ॅड. रोहित शेंडे याला अटक केल्यानंतरही वानखेडे यांना अभय मिळावे यासाठी सेवानिवृत्तीनंतर दोन वर्षे मुदतवाढ मिळविणारे महसूलमंत्र्यांच्या सेवेतील खासगी सहायक प्रयत्न करीत होते. परंतु, शेंडे आणि वानखेडे यांच्यातील लाचेबाबतच्या खुल्या संभाषणामुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यास नकार देत दहा दिवसांनंतर गुन्हा दाखल केला.

वानखेडे यांची नियुक्ती होणार, याची कुणकुण लागताच पुणे येथील भूमी अभिलेख कर्मचारी संघटनेचे प्रताप मोहिते यांनी थेट महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन या अधिकाऱ्याच्या नियुक्तीस विरोध केला होता.

हा अधिकारी प्रचंड भ्रष्ट असल्याचे निदर्शनास आणून दिले होते, असे संघटनेचे प्रमुख मोहिते यांनी सांगितले.

वानखेडे यांच्या नियुक्तीसाठी पदोन्नती मिळून त्या पदावर आलेल्या किशोर तवरेज यांना हटविण्यात आले होते. त्यामुळे त्यांनी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाकडे याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर सध्या सुनावणी सुरू असतानाच वानखेडे यांची लाचखोरी बाहेर आली आहे. आपली नियुक्ती होणार, असे वानखेडे आधीच सांगत होता, असे महसूल विभागातील सूत्रांनी सांगितले.

नियुक्तीच्या काळात वानखेडे याने ३१ सुनावण्या पूर्ण करून आदेश दिले होते. याबाबतची कागदपत्रेही शासनाने नियुक्त केलेल्या समितीने ताब्यात घेतली आहेत. या ‘तत्परते’बरोबरच दररोज सुनावण्या घेण्याचा विक्रमही वानखेडे यांनी केला होता, असे सूत्रांनी सांगितले.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा अहवाल मिळाल्यानंतर वानखेडे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्या विभागीय चौकशीचे आदेशही शासनाने दिले आहेत.

– एस. चोकलिंगम, जमाबंदी आयुक्त