शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूची नोंदणी ‘जन्म नोंदणी’च्या वहीत केल्याचे वृत्त वाऱ्याच्या वेगाने मुंबईत पसरले आणि सर्वसामान्य शिवसैनिकांमध्ये चीड व्यक्त करण्यात आली. मात्र महापालिकेतील शिवसेनेच्या नगरसेवकांच्या लेखी मात्र ही घटना ‘अदखलपात्र’च राहिली. महापालिका सभागृहाच्या दिवसभराच्या कामकाजामध्ये सेनेच्या एकाही नगरसेवकाला ही गंभीर बाब उपस्थित करावीशी का वाटली नाही, याचे आश्चर्य पालिका वर्तुळात व्यक्त करण्यात येत होते.
पालिका सभागृहात शुक्रवारी नगरसेवकांनी सादर केलेल्या रटाळ ठरावांच्या सूचनांवर चर्चेचे गुऱ्हाळ सुरू होते. मात्र आपले आराध्य दैवत असलेल्या बाळासाहेबांच्या मृत्यूची नोंदणी जन्म नोंदणीच्या वहीत करण्यात आल्याबद्दल शिवसेनेच्या एकाही नगरसेवकाने बैठकीत संताप व्यक्त केला नाही. शिवसेनेचे नगरसेवक या गंभीर प्रकारावरून आयुक्त सीताराम कुंटे यांना धारेवर धरतील, अशी अपेक्षा होती. परंतु सभागृह नेते यशोधर फणसे, स्थायी समिती अध्यक्ष राहुल शेवाळे यांच्यासह जुन्या जाणत्या नगरसेवकांनीही या विषयावर मौन पाळले.
महापौर तसेच फणसे, शेवाळे आणि अन्य ज्येष्ठ नगरसेवकांनीच या संदर्भात मौन पाळल्यामुळे या विषयाला वाचा कशी फोडायची, असा प्रश्न नव्या नगरसेवकांना पडला होता. मग तेही मूग गिळून गप्प बसले. यावरून पुन्हा एकदा नव्या-जुन्या नगरसेवकांमधील दरी वाढत असल्याचे स्पष्ट होत आहे.