रायगड जिल्ह्यातील बाळगंगा धरण घोटाळ्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सिंचन विभागातील तीन आजी – माजी अधिका-यांना अटक केली आहे. सिंचन विभागातील तत्कालीन कार्यकारी संचालक गिरीश बाबर, ठाणे जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता रामचंद्र शिंदे, कोकण जलसंपदा विभागाचे निवृत्त मुख्य अभियंता बाळासाहेब पाटील अशी या अधिका-यांची नावे असून त्यांना ठाणे जिल्हा सत्र न्यायालयाने ८ नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

पेण परिसरातील बाळगंगा नदीवरील धरण गैरव्यवहाराप्रकरणी जलसंपदा विभागातील सहा अधिकारी, कंत्राटदार व त्याचे चार भागीदार अशा ११ जणांविरुद्ध गेल्या वर्षी कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता. या सर्वांनी धरणाच्या कामाच्या खर्चात वाढ करून सरकारचे तब्बल ९२ कोटी ६३ लाख ४२ हजार रुपयांचे नुकसान केल्याची माहिती तपासातून समोर आली होती. याप्रकरणी दोन महिन्यांपूर्वीच ठाणे सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. आरोपपत्रात गिरीश बाबर, रामचंद्र शिंदे, बाळासाहेब पाटील या तिघांच्या नावाचा समावेश होता. या तिघांनाही अटक करण्याचे आदेश ठाणे कोर्टाने दिले होते. यानुसार तिघांनीही अटक करण्यात आली आहे.  बाळगंगा धरण घोटाळ्याप्रकरणी अजित पवार आणि सुनील तटकरे या दोघांचीही चौकशी होणार असल्याची चर्चा होती.

बाळगंगा नदीवरील धरणाच्या कामासाठी कोकण पाटबंधारे विकास महामंडळाने २००९  मध्ये निविदा मागवल्या होत्या. यात एकूण चार कंत्राटदारांनी सहभाग घेतला. यातील एफ. ए. एंटरप्रायजेसला हे कंत्राट दिले गेले. पण पोलीस तपासात उर्वरित तिन्ही कंत्राटदार हे बनावट असल्याचे समोर आले होते. एफ ए एंटरप्रायजेसने सरकारी अधिका-यांच्या मदतीने हा गैरव्यवहार केल्याचा दावाही पोलिसांनी केला आहे. नवी मुंबई आणि परिसरातील तहान भागवण्यासाठी ३५० दशलक्ष पाणी साठवण्याची क्षमता असलेल्या बाळगंगा धरणाचे काम हाती घेण्यात आले होते.