प्रेमसंबंधांतील तणाव कारणीभूत?

‘बालिका वधू’ या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जी (२४) हिने शुक्रवारी राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. प्रेमसंबंधांत निर्माण झालेल्या तणावामुळे प्रत्युषाने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज मुंबई पोलिसांनी वर्तवला आहे.

मूळची जमशेदपूरची असलेली प्रत्युषा २०१० सालापासून मुंबईत राहात होती. तिच्या ‘बालिका वधू’ या मालिकेला अफाट लोकप्रियता मिळाली. तब्बल तीन वर्षे ही मालिका सुरू होती. तेव्हापासून प्रत्युषा कायम प्रसिद्धीच्या झोतात होती. ‘बिग बॉस’ मध्येही तिने सहभाग घेतला होता. गुलमोहर ग्रँड, कॉमेडी क्लासेस, कुमकुम भाग्य, मन मे है विश्वास या मालिका व कार्यक्रमांतही प्रत्युषाचा सहभाग होता. अल्पावधीतच लोकप्रियतेचे शिखर गाठलेल्या प्रत्युषाचे खासगी आयुष्य मात्र तणावाचे होते. २०१३ मध्ये तिने प्रियकर मकरंद मल्होत्राविरोधात पोलिसांत तक्रार केली होती. तसेच पोलिसांनी आपल्या घरात जबरदस्तीने प्रवेश केल्याची तक्रारही प्रत्युषाने कांदिवली पोलीस ठाण्यात नोंदवली होती. अलीकडेच तिचे राहुलराज सिंग या दिग्दर्शकाशी प्रेमसंबंध जुळले होते. यंदा आपण

लग्नगाठ बांधणार असल्याचेही प्रत्युषाने मित्रपरिवारात जाहीर केले होते. परंतु राहुलने प्रेमसंबंध ठेवण्यास नकार दिल्याने प्रत्युषा प्रचंड तणावात होती. त्याच अवस्थेत ती अलीकडेच गोरेगाव लिंक रोड येथील ‘हार्मनी रेसिडेन्शिअल’ मध्ये राहण्यास आली होती. मुलीच्या मानसिक अवस्थेच्या पाश्र्वभूमीवर प्रत्युषाची आई तिच्यासोबत राहण्यास आली होती. मात्र, शुक्रवारी प्रत्युषाने गळफास लावून आत्महत्या केली. सायंकाळी तिच्या आईला प्रत्युषाचा मृतदेह तिच्या खोलीत आढळून आला. तिने तातडीने शेजाऱ्यांच्या मदतीने अंधेरीतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी प्रत्युषाला मृत घोषित केले. दरम्यान, गुरुवारी मध्यरात्री प्रत्युषाने तिचे व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस बदलत ‘मरके भी तुझसे मुँह न मोडना’, असे स्टेटस ठेवले होते. प्रत्युषाच्या आत्महत्येमागे राहुलराजशी असलेले प्रेसंबंध कारणीभूत आहेत का, याची चाचपणी बांगुरनगर पोलीस करत आहेत. आत्महत्येपूर्वी प्रत्युषाने चिठ्ठी वगैरे लिहिली नसल्याचेही पोलिसांनी सांगितले.