पाकिस्तानविरोधी कारवायांच्या आरोपावरून बलुचिस्तानमध्ये अटक करण्यात आलेला रॉ या भारतीय गुप्तचर खात्याचा कथित अधिकारी मुंबईचा असल्याची माहिती पुढे आली आहे. दक्षिण बलुचिस्तानमधून ताब्यात घेण्यात आलेला हा अधिकारी भारतासाठी हेरगिरी करत असल्याचा पाकिस्तानचा आरोप आहे. बलुचिस्तानचे गृहमंत्री मीर सरफराज बुगटी यांनी गुरुवारी सांगितले, की या भारतीय अधिकाऱ्याचे नाव कुलभूषण यादव असे असून, तो कमांडिंग ऑफि सर दर्जाचा नौदलातील अधिकारी आहे व तो रॉ या संस्थेसाठी काम करीत होता. बुगटी यांनी असा दावा केला, की भूषण हा बलुचिस्तानातील फुटीरतावाद्यांच्या कारवायांना खतपाणी घालत असल्याचे बुगटी यांनी म्हटले होते. कुलभूषण जाधव हे मुंबईतील माजी सहायक पोलीस आयुक्त सुधीर जाधव यांचे पूत्र आहेत. ते आठ वर्षांपूर्वी पोलीस दलातून निवृत्त झाले होते. कुलभूषण यांचे कुटुंबीय पवई येथील हिरानंदनी भागात राहत असल्याचे सूत्रांनी सांगितले.
दरम्यान, या प्रकरणी भारताचे पाकिस्तानातील उच्चायुक्त गौतम बंबवाले यांना बोलावून पाकिस्तानने निषेध नोंदवला होता. मात्र, भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तानचे सर्व आरोप फेटाळत अटक करण्यात आलेल्या व्यक्तीशी सरकारचा काही संबंध नसल्याचे स्पष्ट केले. त्यांनी नौदलातून मुदतीपूर्वीच निवृत्ती घेतलेली आहे. पाकिस्तानच्या अंतर्गत कारभारात ढवळाढवळ करण्यात भारताला अजिबात स्वारस्य नसल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले.