सभागृहाची आज तातडीची बैठक; भाजप एकाकी

चार दिवस मांसविक्री बंदी लागू केल्याच्या निषेधार्थ शिवसेना, मनसे, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि समाजवादी पार्टी एकत्र आले असून पालिकेने चारपैकी दोन दिवस लागू केलेली मांसविक्री बंदी तात्काळ रद्द करण्याच्या मागणीसाठी पालिका सभागृहाची शुक्रवारी तातडीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. जनमानसात तीव्र भावना उमटल्यामुळे बिथरलेल्या भाजपने शरणागती पत्करत या मागणीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याचे समजते.

पर्युषण काळात राज्य सरकार आणि पालिकेने प्रत्येकी दोन दिवस अशी एकूण चार दिवस देवनार पशुवधगृह आणि मांसविक्री बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे चार दिवस मुंबईत मांसविक्री बंदी आहे. पालिकेने दोन दिवस केलेली मांसविक्री बंदी तात्काळ रद्द करावी, या मागणीसाठी सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव यांनी पालिका सभागृहाची शुक्रवारी तातडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीत विश्वासराव निवेदनाद्वारे ही मागणी करणार आहेत. तर या बंदीविरोधात सर्वच पक्ष एकत्र आल्यामुळे आणि प्रतिमा डागाळल्याने भाजपने शरणागती पत्करली आहे. शिवसेनेच्या या मागणीला सभागृहात पाठिंबा देण्याच्या तयारीत भाजप आहे.
आशीष शेलार यांनी पर्युषण काळात पशुवधगृह बंद ठेवण्याचा कालावधी कमी करण्याची मागणी पालिका आयुक्त अजय मेहता यांच्याकडे केली आहे.
भाजपचे राज्यात सरकार आहे. त्यामुळे शेलार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून लागू केलेली मांसविक्री बंदी उठवावी, असे आवाहन मनसेचे गटनेते संदीप देशपांडे यांनी केले
आहे.