निकोप व निर्दोष लोकशाहीला मारक ठरणारी आणि आंबेडकरी राजकारणाला लाचार करणारी प्रचलीत निवडणूक पद्धत रद्द करावी आणि त्याऐवजी प्रमाणपद्ध प्रतिनिधीत्वाच्या निवडणूक पद्धतीचा स्वीकार करावा, या मागणीसाठी देशभर प्रबोधन व आंदोलन करण्याचा निर्धार फुले-आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात व्यक्त करण्यात आला. अलीकडेच पार पडलेल्या लोकसभा व विधासभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्षांच्या विविध गटांसह बहुजन समाज पक्षाचाही पार सफाया झाला. निवडणुकीत रिपब्लिकन राजकारणाचा जेव्हाजेव्हा पराभव होतो, तेव्हा ऐक्याच्या भावनिक चर्चेला उधाण येते. परंतु बाबासाहेब आंबेडकर यांनी  लोकशाही शासनप्रणाली रुजवण्यासाठी तिला पूरक अशी निवडणूक पद्धत हवी होती, याचे अनेकदा सुस्पष्ट भाष्य केलेले आहे. सेक्यूलर मूव्हमेंट या संघटनेच्या वतीने मुंबईत फुले-आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांचा मेळावा झाला, त्यात ही मागणी केली.